Uncategorized

Pimpri News : निओ मेट्रोला ‘रेड सिग्नल’

अमृता चौगुले

पिंपरी : पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गास केंद्र शासनाने नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र, भोसरी ते चाकण आणि पिंपरी-चिंचवड 'एचसीएमटीआर' मधील (हाय कॅपॅसिटी मास ट्रॉन्झीस्ट रुट- रिंगरोड) निओ मेट्रोचा डीपीआर गेल्या तीन वर्षांपासून धूळ खात पडून आहे. देशात तसेच, महाराष्ट्र राज्यात निओ मेट्रो प्रकल्प कार्यान्वित नसल्याने या नव्या दोन मार्गास केंद्र व राज्य शासनाने रेड सिग्नल दाखविला आहे. मंजुरी मिळविण्याबाबत हालचाली दिसत नसल्याने हा मार्ग प्रत्यक्षात जमिनीवर उतरणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहराची गरज म्हणून दापोडी ते निगडी या 12.50 किलोमीटर अंतर मार्गावर पिंपरी ते दापोडी आणि पिंपरी ते निगडी असे दोन तुकड्यात मेट्रो मार्गाचा डीपीआर करण्यात आला. त्यानंतर पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी, तळेगाव व चाकण एमआयडीसी परिसरातील कामगार व प्रवाशांच्या सोयीसाठी इंद्रायणीनगर, भोसरी ते चाकण असा 16.11 किलोमीटर अंतराचा डीपीआर महापालिकेने महामेट्रोकडून तयार करून घेतला. सुधारित डीपीआर 13 डिसेंबर 2022 ला सादर करण्यात आला.

भोसरी-चाकण मार्गावरील प्रस्तावित स्टेशन्स

भोसरी डिस्ट्रीक्ट सेंट्रल (पूर्व), पीआयईसी सेंटर, बनकरवाडी, भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बार्गे वस्ती, कुरूळी, आळंदी फाटा, मुक्तेवाडी, तळेगाव चौक, चाकण चौक असे एकूण 11 स्टेशन आहेत. या मार्गाचा खर्च 1 हजार 548 कोटी 14 लाख इतका अपेक्षित आहे. तसेच, शहरातील नाशिक फाटा, पिंपळे गुरव, सुदर्शननगर, कोकणे चौक, काळेवाडी फाटा, तापकीर चौक, वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी, संचेती स्कूल, बिर्ला रुग्णालय, वाल्हेकरवाडी, रानमळा हॉटेल, स्पाइन रस्ता, रेलविहार चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन, निसर्ग दर्शन सोसायटी, निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक, स्पाइन रस्ता, त्रिवेणीनगर, रूपीनगर, टाटा मोटर्स, जॅग्वार कंपनीसमोरून इंद्रायणीनगर, स्वामी समर्थ स्कूल, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर चौक, टेल्को रस्ता, सेंच्युरी एन्का, लांडेवाडी असा हा 31.40 किलोमीटर अंतराच्या रिंगरोड मार्गावर निओ मेट्रोचा प्रस्ताव आहे. त्याचा डीपीआरही महापालिकेने महामेट्रोकडून सन 2019 मध्ये तयार करून घेतला. त्यात काही सुधारणा करण्यात आल्या. रिंगरोडसाठी 2 हजार 300 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हे दोन्ही मार्ग एलिव्हेटर (उन्नत) आहेत. रिंगरोड भोसरी-चाकण मार्गास जोडला जाणार आहे.

या दोन्ही प्रकल्पांचे सुधारित डीपीआरचे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर, तत्कालीन आयुक्त राजेश पाटील व सध्याचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले आहे. या दोन्ही मार्गासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आग्रही आहेत. त्यांनी याबाबत अनेक बैठकांही घेतल्या आहेत. देशात कोठेच निओ मेट्रो धावत नसल्याने त्या प्रकल्पात केंद्र व राज्याकडून रेड सिग्नल मिळाला असून, अद्याप मंजुरी मिळालेली नाही. हे दोन्ही डीपीआर धूळ खात पडून आहेत. त्यामुळे हे मार्ग प्रत्यक्षात निर्माण होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

निओ मेट्रो म्हणजे काय?

हायस्पीड टायरबेस्ड एलिव्हेटेड निओ मेट्रो या मार्गावर धावणार आहे. ती रबरचे टायर असलेली बस आहे. ती विजेवर धावते. ती बस वातानुकूलीत असणार आहे. निओ मेट्रोचे कोचेस, सोयीसुविधा, स्टेशन व इतर सेवा मेट्रोप्रमाणेच असणार अहेत. निओ मेट्रो रुळांऐवजी रबरी टायरवर धावते. त्याच्या एका कोचमध्ये 180 ते 250 प्रवासी प्रवास करू शकतात. ती एकावेळी तीन कोचेससह धावते. निओ मेट्रोची रचना बससारखी आहे. त्याचा खर्च मेट्रोपेक्षा खूपच कमी आहे.

निओ मेट्रो पर्यायाला प्रतिसाद नाही

भोसरी ते चाकण आणि पिंपरी-चिंचवड शहरातील एचसीएमटीआर मार्गावर निओ मेट्रो या पर्यायाचा डीपीआर महामेट्रोकडून तयार करून महापालिकेस सादर करण्यात आला आहे. मात्र, शासनाकडून त्याला पाठिंबा मिळत नाही आहे. मेट्रोऐवजी निओ मेट्रो हा पर्याय केंद्रांकडून स्वीकारला गेला नाही, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT