Uncategorized

औरंगाबाद : नाना पटोलेंनी पदयात्रेतून घेतला काढता पाय

मोनिका क्षीरसागर

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा: देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शहर काँग्रेसच्या वतीने गुरुवारी काढण्यात आलेल्या आझादी गौरवपदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा प्रमुख समावेश होता; पण ही पदयात्रा मध्यावर येताच नाना पटोलेंनी या पदयात्रेतून काढता पाय घेतला. शहागंज येथील महात्मा गांधी पुतळ्यास अभिवादन करून या पदयात्रेची सुरूवात करण्यात आली. ही पदयात्रा अवघ्या अर्धा किलोमीटर चालल्यानंतर लगेचच कॉग्रेसचे नाना पाटोलेंनी सिटी चौकातूच बाहेर पडत ते पुढच्या प्रवासासाठी मार्गस्त झाले. यानंतर ते जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळेंच्या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले.

सकाळी साडेनऊ वाजता ही पदयात्रा निघणार होती, दहा वाजेपासून कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. यावेळी यात्रेसाठी काही शाळेच्या मुली, महिलांची जेमतेम गर्दी होती. दुपारी दीड वाजता पटोले आल्यानंतर पदयात्रा निघाली, मात्र तिथेही बेशिस्तपणा दिसून आला. पटोले व नेते मागे तर शहरातील कार्यकर्ते पुढे , हे चित्र पाहून, नाना भडकले. त्यांनी सर्वांना आपल्या मागे व्हा, अशा सूचना दिल्या. कार्यकर्ते कुणीच नाही, सर्व नेते झाल्याचा प्रत्यय त्यांना आला. पदयात्रा अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर लगेचच त्यांनी शहराध्यक्ष शेख युसूफ यांच्याकडे तिरंगा ध्वज देऊन, सिटी चौकातून पदयात्रा अर्धवट सोडून पुढच्या दौऱ्याकडे धाव घेतली.

या पदयात्रेत मार्गातील सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यात येणार होते. मात्र नाना निघून गेल्याने गुलमंडीवरील शहराचे पहिले नगराध्यक्ष द्वारकादास पटेल यांच्या पुतळ्यास अभिवादन न करताच नेते पैठण गेटला आले. याठिकाणी गोविंदभाई श्रॉफ, लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. पुढे क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पदयात्रेचा समारोप झाला.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT