Uncategorized

Navratri Festival in Goa : गोव्यातील नवरात्रोत्सव | सलग २४ तास भजन करण्याची परंपरा

मोनिका क्षीरसागर

नवरात्री उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. देशात सर्वत्र हा उत्सव विविध प्रकारे साजरा केला जातो. पश्चिम बंगालची दूर्गापूजा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत होणारी पूजाही विशेष प्रसिद्ध आहे. गोव्यातील दूर्गापूजेची खास असे वैशिष्ट्य आहे. गोव्यातील दूर्गापूजेचा आढावा घेणारा हा लेख.

पणजी : गोव्यात दोन पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा होतो. राज्यात जी अनेक विषेशत: देवींची मंदिरे आहेत, त्या मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव (Navratri Festival in Goa) साजरा होतो. दुसरीकडे गेल्या काही वर्षांमध्ये विविध ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त सभामंडप उभारून तेथे नवदुर्गेच्या मूर्तींची पूजा होते. अशाप्रकारे नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा होतो. यानंतर नवव्या दिवशी मूर्तीचे विसर्जन होते. आणि मंडप काढला जातो.

गोव्यात श्री शांतादुर्गाची सर्वात जास्त मंदिरे आहेत. फातर्फा व कवळे येथील शांतादुर्गा प्रसिद्ध आहेत. तसेच येथे श्री सातेरी व केळबाय आणि श्री नवदुर्गेचीही मंदिरे मोठ्या प्रमाणात आहेत. बोरीची नवदुर्गा प्रसिद्ध आहे. श्री लईराईचे शिरगाव येथे प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच पणजी व बांदिवडे येथील श्री महालक्ष्मी मंदिरे प्रसिद्ध आहेत. या सर्वच देवस्थानात मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा होतो. त्याचबरोबर श्री महालसा (Navratri Festival in Goa) व इतर मंदिरातही नवरात्रोत्सव साजरा होतो.

इतर देवतांच्या मंदिरांमध्येही पारंपरिक पद्धतीने प्रत्येक गावागावात नवरात्र उत्सव साजरा होतो. त्यानिमित्त बहुतांश ठिकाणी दररोज पूजा, भजन, कीर्तन सादर होते. पहिल्या दिवशी घटस्थापना झाल्यानंतर अनेक मंदिराच्या आतील भागामध्ये विविध प्रकारचे धान्य रुजण्यासाठी घातले जाते. नवव्या दिवशी ते काढून सोने म्हणून वाटले जाते. या नऊ दिवसांमध्ये गावातील त्या त्या मंदिरामध्ये स्थानिक कलाकार भजन सादर करतातच, त्याचबरोबर नऊ दिवसांतील एक किंवा दोन दिवस हरिनाम सप्ताह किंवा भजन सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्या सप्ताहामध्ये उभे राहून सलगपणे २४ तास भजन करण्याची परंपरा अनेक गावांमध्ये आहे. कीर्तनाचे कार्यक्रम ,भक्ती गीताचे कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर होतात. नाटके, ऑर्केस्ट्रा, जादूचे प्रयोग, दांडिया आदींचे आयोजन ही केले जाते.

गावातील क्वचितच मंदिरामध्ये नवदुर्गा देवीच्या मातीच्या मूर्तीचे पूजन होते. त्या मंदिरामध्ये ज्या देवीची मूर्ती आहे, तिलाच नवदुर्गेच्या रूपामध्ये पूजले जाते. नऊ दिवस वेगवेगळी वेशभूषा त्या मूर्तीला केली जाते. फक्त देवीच्याच नव्हे तर मंगेश, रवळनाथ, गणेश आदी देवतांच्या मंदिरात सुद्धा नवरात्रोत्सवाचे आयोजन होते.

सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच विशेषत: शहरी भागामध्ये नवदुर्गा मंडळे स्थापन करून, मोठ्या मंडपात नवरात्र उत्सवाचे आयोजन केले जाते. या मंडपात मातीच्या नवदुर्गा देवी मूर्ती बसवली जाते. पहिल्या दिवशी नवदुर्गा देवीच्या मूर्तीचे पूजन होते आणि मग पूजा-अर्चा भजन-कीर्तनाचे कार्यक्रम दररोज सादर केले जातात. काही ठिकाणी ऑर्केस्र्टा तसेच नाटकांचेही आयोजन केले जाते.

गेल्या काही वर्षांमध्ये गोव्यामध्ये दांडिया अर्थात गरबा नृत्य स्पर्धांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे या दांडिया नृत्य पथकांची संख्या फारच घटली आहे. त्यापूर्वी गावागावातील कुठल्या ना कुठल्या मंदिरांमध्ये दररोज दांडिया नृत्य स्पर्धेचे आयोजन होत होते. त्या स्पर्धा पहाटे पाच ते सहा वाजेपर्यंत चालत होत्या. त्यामुळे गावागावातील अनेक तरुण तरुणींनी आपापली गरबा दांडिया नृत्य पथके स्थापन केली होती. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दांडिया नृत्य कलाकारही तयार झाले होते.

कामानिमित्त किंवा व्यवसाय करण्यासाठी गोव्यात येऊन त्यानंतर येथे स्थायिक झालेल्या बंगाली समाज, गुजराती समाज आदी विविध राज्यातील नागरिकांतर्फे वेगवेगळ्या पद्धतीने विविध ठिकाणी नवरात्र उत्सवाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये त्या त्या राज्यातील नागरिक एकत्र येऊन विविध कार्यक्रम सादर करतात अशाप्रकारे गोव्यात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT