Uncategorized

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामुळे तळागाळापर्यंत पोहोचली ज्ञानगंगा

अंजली राऊत

नाशिक : 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला नुकतेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेचे (नॅक) 'अ' मूल्यांकन प्राप्त झाले आहे. तीन दशकांची देदीप्यमान कारकीर्द लाभलेल्या या विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. विद्यार्थिकेंद्रित शिक्षणक्रम राबवितानाच या लोकविद्यापीठाने अनेक सामाजिक कामांमध्येही आपला सहभाग नोंदवला आहे. नॅकचे 'अ' मूल्यांकन प्राप्त करून मुक्त विद्यापीठाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (वायसीएमओयू)ची स्थापना महाराष्ट्राच्या राज्य विधीमंडळ परिषदेच्या कायद्याद्वारे 1989 मध्ये झाली. मुक्त विद्यापीठाने गेल्या तीस वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली आहे आणि विद्यापीठाने अनेक वैविध्यपूर्ण आणि सर्वसामान्यांना उपयुक्त अशा क्षेत्रात काम केले आहे. विद्यापीठाचे उद्दिष्ट म्हणजे 'ज्ञानगंगा घरोघरी' म्हणजे प्रत्येक घरापर्यंत शिक्षण असे आहे. नुकत्याच झालेल्या कोविड-19 साथीने विद्यार्थी आणि पालकांना जीवनाचा कोणताही धोका पत्कारत पाल्यांच्या शिक्षणाबद्दल विचार करण्यास भाग पाडले आहे. याच कारणांमुळे मुक्त आणि दूरस्थ शिक्षण (ओडीएल) आजच्या परिस्थितीतील सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये दरवर्षी नोंदणीकृत विद्यार्थ्यांमध्ये 85 % पेक्षा जास्त विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतात. म्हणूनच शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांसह सर्व घटकांना शिक्षण प्रदान करण्याचा पर्याय मुक्त आणि दूरस्थ शिक्षणपद्धतीत आहे. मुक्त आणि दूरस्थ शिक्षणपद्धतीत (ओडीएल मोड) शिकण्याची लवचिकता तणावमुक्त शिक्षण प्रदान करते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते शाळा किंवा महाविद्यालयात न जाताही आपल्या स्वत:च्या गतीने पूर्ण केले जाऊ शकते. ऑनलाइन परीक्षेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मुक्त विद्यापीठाच्या अत्याधुनिक प्रणालीचे महाराष्ट्र शासनाने कौतुक केले आहे.

तीन दशकांहून अधिकच्या या वाटचालीत 'ज्ञानगंगा घरोघरी' पोहोचवताना 'मुक्त विद्यापीठ ते लोकविद्यापीठ' अशी समर्थ व यशस्वी वाटचाल या विद्यापीठाने केली आहे. या तीन दशकांत विद्यापीठाने नॅकचा 'अ' दर्जा प्राप्त करण्याबरोबरच कॉमनवेल्थसारखे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार मिळविले आहेत. त्याचबरोबर कोरोना महामारीच्या कठीण काळात सर्वाधिक आठ हजारांहून अधिक ऑनलाइन अभ्यासवर्ग यशस्वीरीत्या आयोजित करून एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. नोकरी, व्यवसाय, घर सांभाळून शिक्षण घेऊ इच्छिणार्‍यांना किंवा उच्चशिक्षण घेण्याची इच्छा असलेल्यांना कला, वाणिज्य, विज्ञान व कृषी क्षेत्रासह कौशल्याधारित असंख्य पर्याय मुक्त विद्यापीठाने आजवर उपलब्ध करून दिले आहेत. काळाच्या नवनवीन आव्हानांना समर्थपणे पेलत विद्यापीठ आज शैक्षणिक क्षेत्रातील यशाची एकेक शिखरे पादाक्रांत करत आहे. विद्यापीठाच्या विविध 152 शिक्षणक्रमांसाठी राज्यभरातील आठ विभागीय केंद्रांतर्गत सुमारे सहा लाख विद्यार्थी प्रविष्ट आहेत. मागील शैक्षणिक वर्षात सर्व आठही विभागीय केंद्रांच्या सहकार्याने एक-दोन नव्हे तर तब्बल आठ हजारांहून अधिक ऑनलाइन अभ्यास वर्गांचे यशस्वीरीत्या आयोजन करून शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श उभा केला. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी या अभ्यासवर्गाचा फायदा घेतला. या कालावधीत विद्यापीठाचे आवश्यक कामदेखील ऑनलाइन पद्धतीने अखंडितपणे सुरूच होते. आगामी काळात व्यवसायाभिमुख व कौशल्याधारित अभ्यासक्रमांवर भर देण्याचा संकल्प विद्यापीठाने केला होता. त्यानुसार गत वर्षभरात विविध प्रकारच्या व्यवसायाभिमुख व कौशल्याधारित अभ्यासक्रमांना चालना दिली. प्रामुख्याने अंध विद्यार्थ्यांसाठी 'नॅब'च्या सहकार्याने सुरू केलेला व्यवसायाभिमुख शिक्षणक्रम किंवा 'निमा'सारख्या औद्योगिक संस्थेबरोबर विद्यार्थ्यांसाठी 'कमवा व शिका' योजनेचा केलेला सामंजस्य करार यांचा उल्लेख करता येईल. विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात शेती व त्यावर आधारित विविध उद्योग-व्यवसायांचे नियमित प्रशिक्षण दिले जात असते. यंदाही 'स्मार्ट शेती – शेतकरी उत्पादक कंपन्यांची गरज' यासारख्या नवनवीन व उपयुक्त कार्यशाळा विद्यापीठातील या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आल्या. कला, वाणिज्य, निरंतर शिक्षण, संगणक, कृषी, विज्ञान व आरोग्य क्षेत्रातील यशस्वी शिक्षणक्रमांनंतर विद्यापीठाने मनोरंजन क्षेत्राकडे आपले लक्ष वळवले आहे. त्यानुसार विद्यापीठातर्फे पटकथा लेखन, व्हिडिओग्राफी, नाट्यशास्त्र, तसेच फाइन आर्टस् यांसारखे शिक्षणक्रम राबविण्यात येत आहेत. शैक्षणिक क्षेत्राव्यतिरिक्त विद्यापीठ नेहमीच आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आलेले आहे. कोरोना महामारीच्या लढाईसाठी विद्यापीठाने मदत केली. शेतमजूर कुटुंबांनादेखील विद्यापीठाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. कोल्हापूर, सांगलीमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विद्यापीठाचा खास चमू तेथे सर्व साधनसामग्रीसह कार्यरत होता. हळूहळू सर्वच शिक्षणक्रमांची क्रमिक पुस्तके भविष्यात पीडीएफ, ऑडिओ बुक यासारख्या डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. वेबरेडिओद्वारे सातत्याने विविध शिक्षणक्रमांचे अभ्यासवर्ग सुरूच आहेत.

– नितीन रणशूर, प्रतिनिधी.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT