Uncategorized

नगर : एटीएम फोडणार्‍या टोळीला 48 तासांत बेड्या

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर-सोलापूर रस्त्यावरील वाकोडी फाटा येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या सराईत आरोपींच्या टोळीला स्थनिक गुन्हे शाखेने 48 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींवर नगरसह छत्रपती संभाजीनगर, सातारा, बीड जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या चार आरोपींपैकी दोन जण सराईत गुन्हेगार आहेत. रविवारी पहाटे वांबोरी फाट्यावरील एटीएम फोडण्याच्या घटनेनंतर 48 तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला आहे.

अजित अरुण ठोसर (वय 22, रा. मातकुळी, ता. आष्टी, जि.बीड, हल्ली रा.साईनगर, ता. संगमनेर), जमीर जाफर पठाण (वय 21, रा. खांडगाव, ता. संगमनेर), रवींद्र वाल्मीक चव्हाण (वय 32), शुभम पोपटराव मंजुळे (वय 25, दोन्ही रा. खडकी, ता. कोपरगाव) अशी आरोपींची नावे आहेत. नगर-सोलापूर रस्त्यावरील वाकोडी फाटा येथील एटीएम कटरच्या साह्याने फोडण्याचा प्रयत्न रविवारी (दि.9) पहाटेच्या सुमारास झाला. मात्र, एटीएममधील सायरन वाजल्याने चोरटे पळून गेले. बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रशांत अशोक साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना विना क्रमांकाची कार एलसीबीच्या पथकाला राहुरी परिसरात भरधाव जाताना दिसली. एलसीबीचे प्रमुख दिनेश आहेर यांनी पथकाला कारचा पाठलाग करण्यास सांगितले व एका पथकाला नगर-मनमाड रस्त्यावर सापळा लावण्याच्या सूचना दिल्या. या पथकान संशयित कारला खातगाव टाकळी शिवारात अडवून दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर इतर दोन आरोपींना एलसीबीच्या पथकाने अटक केली. उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, बाळासाहेब मुळीक, अतुल लोटके, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, संतोष लोढे, संदीप दरदंले, भीमराज खर्से, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, अमृत आढाव, बाळू गुंजाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, भाऊसाहेब काळे, बबन मखरे, ज्ञानेश्वर शिंदे, संभाजी कोतकर, अरुण मोरे यांनी ही कामगिरी पार पाडली.

ठोसर, चव्हाण दोघे सराईत
अजित ऊर्फ कमळ्या अरुण ठोसर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी असे गंभीर 11 गुन्हे दाखल आहेत. रवींद्र वाल्मीक चव्हाण याच्यावर गंभीर 16 गुन्हे दाखल आहेत.

ट्रॅक्टर, कार, दुचाकी जप्त
आरोपींकडून दोन ट्रॅक्टर, एक कार, एक बुलेट, एक अन्य मोटारसायकल असा 18 लाख 16 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, ऑक्सिजन सिलिंडर, गॅसची टाकी, पेंट स्प्रे, स्टील रॉड, लोंखडी पाईप, रेग्युलेटर, नोझल, पक्कड व मोबाईल हे साहित्य जप्त करण्यात आले.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT