पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणाचे २७ पैकी १८ दरवाजे साडेतीन फूट उघडण्यात येऊन ६६ हजार ०२४ क्युसेक पाण्याचा गोदावरी नदीत विसर्ग बुधवारी दुपारी करण्यात आला. सध्या नाथसागर धरणामध्ये ६० हजारांहून अधिक पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी दैनिक 'पुढारी' शी बोलताना दिली.
मंगळवारी सकाळपासूनच नाशिक परिसरातील झालेल्या पावसामुळे येथील नाथसागर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होती. यानंतर आज (दि.१७) रोजी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक येत असल्याने २७ पैकी १८ दरवाजे साडेतीन फूटावर उचलून गोदावरी नदीमध्ये ६६ हजार ०२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी घेतला आहे.
आठवड्यापूर्वी २७ पैकी १० दरवाजे उघडण्यात आले होते. सध्या नाथसागर धरणामध्ये ६० हजारांहून अधिक क्युसेक पाण्याची आवक येत असल्यामुळे धरण ९५ टक्क्यावर कायम ठेवून येणारे पाणी गोदावरी नदी सोडण्यात येत आहे.
हेही वाचलंत का?