UN Climate Report 
Latest

UN Climate Report: जागतिक समुद्र पातळी वाढण्याची गती दुप्पट ; यूएन रिपोर्टमधून खुलासा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. २०२२ हे वर्ष आत्तापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवण्यात आले आहे. याचा परिणाम म्हणजे जागतिक समुद्र पातळीतही झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या दशकात जागतिक समुद्र पातळीत दुप्पट गतीने वाढ झाल्याचे नोंदवले आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी जारी केलेल्या अहवालात (UN Climate Report) दिली आहे.

वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन (WMO) चा एक अहवाल शुक्रवारी (दि.२१) प्रसिद्ध झाला. या अहवालात म्‍हटले आहे की, पृथ्‍वीवरील  तापमानात विक्रमी पातळीवर वाढत आहे. यामुळे लोक उष्णतेने त्रस्त आहेत. २०१५ ते २०२२ ही वर्ष सर्वात उष्ण होती. म्हणजेच या आठ वर्षांत उष्णता विक्रमी पातळीपर्यंत वाढले आहे. हे केवळ याच उन्हाळ्यातले नाही, तर गेली आठ वर्षे उन्हाळा सर्वाधिक उष्ण असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या जाहीर केलेल्या नवीन अहवालातून ( UN Climate Report) स्पष्ट करण्यात आले आहे.

 UN Climate Repor: गेल्या दशकात समुद्र पातळी ४.६२ मिमीने वाढली

गेल्या काही वर्षात उष्णतेत विक्रमी वाढ झाल्याने याचा प्रभाव अंटार्क्टिकावरील ग्लेशियरवर होत आहे. येथील हिमनद्या वेगाने वितळत आहेत. त्यामुळे समुद्राच्या पातळीत देखील वाढ होत आहे. गेल्या एका दशकाच्या तुलनेत वार्षिक सरासरीच्या तुलनेत समुद्राच्या पाण्याची पातळी ४.६२ मिमीने वाढली आहे, असे यूएननेआपल्‍या अहवालात म्हटलं आहे.

ग्लोबल वॉर्मिंगची समस्या गडद

या अहवालात असेही सांगण्यात आले की, गेल्यावर्षी उष्णतेच्या लाटेमुळे एकट्या युरोपमध्ये १५ हजारहून अधिक मृत्यूची नोंद झाली होती. दरम्यान, या अहवालात ऑक्टोबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान हिमनद्या १.३ मीटरपर्यंत वितळली असल्याची चिंता देखील व्यक्त केली आहे. याचे कारण म्हणजे वातावरणातील हरित वायूंचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने हिमनद्याही वितळत आहेत. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे.

UN Climate Report: 'ग्लोबल वॉर्मिंगमुळे अनेक स्थितंतरे'

२०२२ मध्ये पूर्व आफ्रिकेतील सततचा दुष्काळ, पाकिस्तानमध्ये विक्रमी पाऊस पडला. दरम्यान चीन आणि युरोपमध्ये विक्रमी उष्णतेच्या लाटांमुळे लाखो लोकांवर याचा परिणाम झाला. अनेक देशात अन्न असुरक्षितता निर्माण झाली, त्यामुळे लोकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाले. या स्थितीत अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे, असे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन सरचिटणीस पेट्री तालास यांनी या अहवालाच्‍या माध्‍यमातून स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT