भिगवण : पुढारी वृत्तसेवा : उजनीत पाणथळ जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागतच अवघ्या जगभरात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या फ्लेमिंगो पक्षांनी उजनीचा काठ (Ujani dam) बहरून गेला आहे. अग्नीपंखाच्या ज्वालांची अवकाशातील उधळण डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरत आहे.
(Ujani dam) सध्या उजनीची पाणीपातळी कमी होऊ लागल्याने देश-विदेशातील आकाशयात्रींचा प्रवास उजनीच्या दिशेने होऊ लागला आहे. यामुळे उजनीच्या वैभवात कमालीची भर पडू लागली आहे. राज्यातील प्रमुख पर्यटकांपैकी उजनी हा एक पर्याय पक्ष्यांच्या रूपाने पर्यटकांना निर्माण झाला आहे. साहजिकच शहरी वातावरणाला कंटाळलेला मोठा वर्ग उजनीकडे वळताना दिसत आहे. एक दिवसाची उजनी सफर नौका विहार, प्रसिद्ध मासे आणि सोबतीला पक्ष्यांच्या पाणथळ जागेतील कवायती आनंद देणारी ठरत आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून पर्यटन बहरू लागले असले तरी मार्चनंतर खऱ्या अर्थाने उजनीचे सौंदर्य खुलून जाते. कारण पाणीपातळी कमी होऊ लागताच पाणथळ जागा उपलब्ध होतात आणि त्यानंतर देशी- परदेशी पक्ष्यांची मंदियाळी येथे सुरू होते. उन्हाची काहिली प्रचंड वाढली असताना पक्ष्यांचे निखळ सौंदर्य आल्हाददायक ठरत आहे. त्यातच प्रमुख आकर्षण असलेले लांबसडक व देखणे रोहित पक्षी अर्थात अग्निपंखी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यांनी घेतलेली भरारी तर डोळ्यांना सुखद धक्का देणारी आहे. आकाशात ज्वाला निर्माण व्हावा, असा भास त्यांच्याकडे पाहून होतो. हे विलोभनीय दृश्य टिपण्यासाठी आता उजनीकडे धाव घेतलीच पाहिजे, हे मात्र नक्की.
हेही वाचलंत का ?