बारामती; पुढारी वृत्तसेवा : सत्ता गेल्यानंतर उध्दव ठाकरे यांची वक्तव्ये नैराश्येमधून येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना ४४० व्होल्ट्सचा झटका दिला आहे. त्या मानसिकतेतून ते बोलत आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बारामती दौऱ्यावरुन रवाना होताना ते पत्रकारांशी बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, मुंबई महापालिकेचे मतदान होईल तेव्हा त्यांना आपल्या हातून काय चुक झाली हे कळेल. हिंदूत्वापासून ते किती दूर गेलेत हे त्यांना आज नाही कळणार. त्यांचे सध्याचे जे बोलणे आहे ते नैराश्येमध्येच आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सोमवारी उध्दव ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत बोलले नाहीत. त्यांनी भाजपला कसा दगा दिला हे मांडले आहे. त्यातून आता कोणी टीका करत असले तरी या दग्यामुळे शिवसेनेचेच नुकसान झाले आहे. त्यातूनच त्यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. आजवर शिवसेनेचं जे काही चांगलं झाले ते अमित शहा यांच्या नेहमीच्या मध्यस्थीमुळे झाले. सामंजस्याने सांभाळून घेतल्यामुळे झाले. पण अमित शहा यांनी केलेली मदत विसरुन ते पवारांच्या ट्रॅपमध्ये अडकले आहेत. या ट्रॅपमुळे ते अशी वक्तव्ये करत आहेत.
बारामतीत आम्ही संघटना वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. २०१९ मध्ये आम्हाला इथे सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्यानंतर हर्षवर्धन पाटील आमच्यात आले. त्यामुळे १ लाखांपेक्षा अधिक मताने बारामती जिंकू हे मी जबाबदारीने सांगतोय असे बावनकुळे म्हणाले. आम्ही कुणाच्या विरोधात काही बोलत नाही. आम्ही आमची तयारी करत आहोत. आम्हाला खासदारांवर, त्यांच्या कामावर, त्यांच्या पक्षावर काही बोलायचं नाही. पक्ष मजबूत करणे गरजेचे आहे असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा