Latest

नागपूर शहरात दोन दिवसात दोघांची हत्या; कायदा, सुव्यवस्थेचे धिंडवडे

अमृता चौगुले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. कारण नागपुरात गेल्या दोन दिवसात दोघांची हत्या झाली. दोन्ही घटनांमध्ये हत्या झालेले आणि हत्या करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागपुरात गुन्हेगारांचे टोळीयुद्ध सुरु झाल्याचे चित्र आहे.

पहिली घटना नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनअंतर्गत नयी बस्ती परिसरात घडली. सागर शाहू नावाच्या रिक्षाचालकाला "रागाने पाहतो" या क्षुल्लक कारणावरुन विल्सन पिल्ले आणि त्याच्या सहकारी गुंडानी धारदार शस्त्राने जीवे खून केला. गुरुवारी (दि.१२) रात्री सागर शाहू त्याच्या मित्रांसह बिअरबारमध्ये गेला होता. त्या ठिकाणी त्याने दुसऱ्या टेबलवर बसलेल्या विल्सन पिल्लेकडे पाहिले. त्यावेळी विल्सन पिल्लेने माझ्याकडे रागाने का पाहिले यावरुन जुना वाद उकरुन काढला. त्या ठिकाणी वाद वाढत असल्याचं पाहून सागरने तिथून काढता पाय घेतला. मात्र, विल्सन पिल्ले आणि त्याच्या टोळीने घराकडे निघालेल्या सागरचा पाठलाग केला. सागरचे मित्र त्यांच्या घराकडे निघून गेल्यानंतर नयी बस्ती भागात विल्सनच्या टोळीने सागरला घेरले आणि धारदार शस्त्रांनी वार करुन त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपी विल्सन पिल्लेला अटक केली आहे.

दुसरी घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भालदार पुरा भागात घडली होती. अनैतिक संबंधाच्या संशयातून विजय तायवाडे नामक कुख्यात गुंडाची इतर काही गुन्हेगारांनी घरात शिरुन हत्या केली. सुरज धापोडकर नावाच्या कुख्यात गुंडाला त्याच्या पत्नीचे विजय तायवाडेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्याच कारणावरुन त्याने ही विजयला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी सुरज आणि त्याच्या सहकाऱ्यांनी विजयच्या घरावर हल्ला केला होता. मात्र, तेव्हा विजय पळून गेल्याने वाचला होता. सुरजने इतर दोन गुन्हेगारांना सोबत घेत विजयला त्याच्याच घरात घेरले आणि धारदार शस्त्राने जीवे मारले. धक्कादायक बाब म्हणजे या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुरज धापोडकर कुख्यात गुंड असून त्याला नागपुरातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र तो तडीपार असून ही राजरोसपणे नागपुरात राहत होता आणि गुन्हेही करत होता. त्यामुळे नागपुरात गुन्हेगारांची तडीपारी फक्त जाहीर करण्यासाठी आणि नंतर कागदोपत्री ठेवण्यासाठीच आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT