Latest

जुळ्या बहिणींची अजब कहाणी ! प्राथमिक शाळेपासून ते दहावीपर्यंत समानच गुण

अमृता चौगुले

बेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जुळ्या मुलांमधील सारख्या सवयींच्या गोष्टी आपण नेहमीच ऐकत असतो. परंतु,अशा दोन्ही मुलींना अगदी प्राथमिक शिक्षणापासून समान गुण मिळण्याचा प्रकार म्हणजे निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल. अर्थात यामागे त्या मुलांची आणि त्यांच्या पालकांची मेहनतही तितकीच महत्त्वाची ठरते. शुक्रवारी दहावीच्या निकालात बेल्हे गुळूंचवाडीमधील गुंजाळ कुटुंबातील भावना आणि भक्ती या जुळ्या बहिणींना समान 91.40 टक्के गुण मिळविले.

भावना आणि भक्ती पुंडलिक गुंजाळ या जुळ्या बहिणींनी श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर बेल्हे या महाविद्यालयातून दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षांच्या निकालात दोघींना समान गुण मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र दोघींच्या पालक, शिक्षकांना हे नवीन निश्चितच नव्हते. अगदी प्राथमिक स्तरापासून गुळूंचवाडी जिल्हा परिषद शाळा आणि त्यानंतर बेल्हे येथील श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर बेल्हे विद्यालय या एकाच शाळेत शिक्षण झाल्याने या दोघांच्याही समान गुणांचे कोडे पालकांसह शिक्षण मंडळाच्या शिक्षकांनाही सवयीचे झालेले आहे.

मागील 25 वर्षांपासून पुंडलिक गुंजाळ हे ट्रकचालक म्हणून बेल्हे-गुळूंचवाडीकरांना परिचयाचे आहेत. त्यांच्या पत्नी वैशाली शेतकरी तसेच गृहिणी आहेत. पुंडलिक गुंजाळ यांच्या जुळ्या मुली भावना आणि भक्ती यांनी प्राथमिक शिक्षणापासून ते दहावीच्या निकालापर्यंत समान गुण मिळविले आहेत.

दोघींच्या एकत्र अभ्यासाचा परिणाम ?

पहिलीपासूनच आम्ही दोघी बहिणी एकत्र बसून अभ्यास करतो. परिणामी, विषयांचे आकलन दोघींना समान पद्धतीने होते. असे या जुळ्या बहिणींनी त्यांच्या प्रत्येक परीक्षेतील समान गुणांबद्दल सांगितले. मात्र तरीही अशा पद्धतीने एकत्र बसून अभ्यास करणारे मित्र अनेकजण असतात. त्यात क्वचितच कोणाला प्रत्येक परीक्षेत समान गुण पडत असल्याचे ऐकिवात आहे. मात्र, या दोघी जुळ्या बहिणींना प्रत्येक परीक्षेत समसमान गुण कसे पडतात, हे खरोखर कुतूहलच आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT