Latest

Anup Ghoshal passes away | ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’ गाण्याचा आवाज हरपला, गायक अनूप घोषाल यांचे निधन

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : बंगाली- हिंदी गायक अनूप घोषाल यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७७ व्या अखेरचा श्वास घेतला आहे. अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' (Tujhse Naraaz Nahin Zindagi)  सारखी सदाबहार गाणी अनूप यांनी गायली आहेत. (Anup Ghoshal passes away)

पीटीआयच्या वृत्तानुसार, अनूप घोषाल गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर दक्षिण कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी दुपारी १.४० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनूप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. "बंगाली, हिंदी आणि अन्य भाषांत गाणी गायलेले अनूप घोषल यांच्या निधनाविषयी दुःख आणि संवेदना व्यक्त करतो," असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

अनूप घोषाल यांचा जन्म कोलकाता येथे अमूल्य चंद्र घोषाल आणि लाबन्या घोषाल यांच्या घरी झाला. ते ४ वर्षाचे असल्यापासून त्यांच्या आईनी त्यांना गायनास प्रोत्साहन दिले. कमी वयातच ते ऑल इंडिया रेडियाच्या शिशू महल कार्यक्रमाशी जोडले गेले. त्यांनी शिक्षणासोबत संगीताचेही शिक्षण घेतले. वयाच्या १९ वर्षी अनूप यांनी पहिल्यांदा पार्श्वगायक म्हणून गाणे गायिले. सत्यजित रे दिग्दर्शित गुपी गाइन बाघा बाईन या चित्रपटातील गाण्याला त्यांनी आपला आवाज दिला.

अनूप यांनी गायलेली 'तुझसे नाराज नहीं जिंदगी', 'हुस्न भी आप हैं, इश्क भी आप हैं' आणि 'तुम साथ हो जिंदगी भर लिए' यासारखी हिट गाणी खूप लोकप्रिय झाली. हिंदी आणि बंगाली व्यतिरिक्त त्यांनी अनेक भोजपुरी गाण्यांनाही स्वरसाज चढवला.

अनुप राजकीय क्षेत्रातही सक्रिय राहिले. २०११ मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर पश्चिम बंगालमधील उत्तरपाडा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले होते. (Anup Ghoshal passes away)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT