पुणे; पुढारी वृत्तसेवा : कुत्रा चावल्यानंतर त्वरित उपचार न घेतल्यास रेबीज हा विषाणूजन्य आजार होण्याचा धोका वाढतो. रेबीजचा विषाणू थेट मज्जासंस्थेवर हल्ला करतो. महापालिका हद्दीमध्ये गेल्या तीन वर्षांत रेबीजचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. महापालिका हद्दीबाहेरील रेबीज झालेल्या 52 रुग्णांवर शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले आहेत.
दरवर्षी 28 सप्टेंबर हा जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूंपैकी 36 टक्के मृत्यू भारतात होतात. यापैकी 95 टक्के घटनांमध्ये कुत्रा चावल्याने रेबीजची लागण होते. कुत्रा चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास रेबीजचा धोका वाढतो. शहरात जास्तीत जास्त कुत्र्यांचे रेबीजविरोधी लसीकरण व्हावे, यासाठी महापालिकेतर्फे विशेष मोहीम राबवली जात आहे.
कुत्र्यांमध्ये रेबीजची लागण झाली असेल, तर नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. यासाठी कुत्र्यांना दर वर्षी रेबीजविरोधी लसीचे दोन डोस दिले जातात. त्यानंतर दरवर्षी एक डोस दिला जातो. माणसाला कुत्रा चावल्यावर होणाऱ्या जखमेवर उपचारांची दिशा ठरवली जाते. किरकोळ दुखापतीसाठी अँटी रेबीज लस अर्थात एआरव्ही 24 ते 28 तासांच्या आत देणे आवश्यक असते.
श्वानदंशानंतर कसे केले जातात उपचार ?
श्वानदंशानंतर होणाऱ्या जखमेची वर्गवारी खरचटणे ते खोल जखम यानुसार वर्ग 1 ते 4 मध्ये केली जाते. रेबीजचा विषाणू मज्जारज्जूमधून प्रवास करतो. त्याच्या प्रवासाचा वेग जितका जास्त असेल तितका धोका वाढतो. नखे लागल्याने उमटलेले किरकोळ व्रण, खरचटणे, छोटीशी जखम अशा स्थितीमध्ये एआरव्ही लसीचे 3 किंवा 5 इंजेक्शनचे डोस दिले जातात. यामध्ये 0,7,14, 28 अशा दिवसांचे अंतर ठेवले जाते. जखम खोल असेल अथवा मेंदूपासून जवळ असलेल्या अवयवाला कुत्रा चावला असेल, तर विषाणू जागीच मारता यावा आणि अँटीबॉडी तयार व्हाव्यात, यासाठी जखमेच्या जागी इंजेक्शन दिले जाते. जखमेची तीव्रता लक्षात घेऊन कुत्रा चावल्यापासून 24 तासांच्या आत इम्युनोग्लोब्युलिनचे एक किंवा दोन डोस दिले जातात.
हेही वाचा