पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
महामार्गावर पांढरे पट्टे मारत असलेल्या पाच कामगारांना भरधाव ट्रकने धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाले आहेत. पुणे- मुंबई महामार्गावर रावेत येथे पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
साजीद खान (वय २५) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर, संदीप कुमार, प्रल्हाद यादव, भोला कुमार, अनिल कुमार अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- मुंबई महामार्गावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कामगार पहाटेच्या सुमारास रावेत येथे काम करीत होते. त्यावेळी मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या ट्रकने कामगारांना धडक दिली.
यामध्ये खान यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य चार कामगारांच्या अंगावर उकळता रंग उडाल्याने ते देखील जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.