मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मशिदीवरील भोंगे उतरविण्यावरुन सुरु झालेले राजकारण, हनुमान चालीसा पठण आणि महाआरत्यांपर्यंत पोहचले असल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी मशिदींसोबतच अतिसंवेदनशील आणि महत्वाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. हनुमान चालीसा पठन आणि महाआरती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपला आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मुंबई पोलीस आयुक्त संंजय पांडे यांच्यासोबत एक बैठक घेतली. त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता. त्यानंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. सोबतच पोलीस दल उद्भवणाऱ्या प्रत्येक समस्येला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांना अर्लट देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य पोलीस दलातील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून राज्यातील महत्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणच् बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. यासाठी राज्यातील पोलिसांच्या मदतीला ८७ एसपीआरएफ पथके, ३० हजार गृहरक्षक जवान तैनात करण्यात आले आहेत.राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे, असा विश्वास रजनीश सेठ यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात शांतता कायम ठेवण्यासाठी आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी मोहल्ला समितींसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे पोलीस दल आता कोणत्याही कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्येला तोंड देण्यासाठी सक्षम आणि कोणत्याही प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे सेठ यांनी स्पष्ट केले.
राज्यातील गुन्हेगार, समजा कंटकांकडून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून १५ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत १३ हजार जणांना सीआरपीसी कलम १४९ अंतर्गत नोटीसही बजावल्या आहेत. यावेळी जातीय तेढ निर्माण करुन कायदा हातात घेत सार्वजनिक शांतता भंग करणार्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही सेठ यांनी स्पष्ट केले.
पाहा व्हिडिओ : राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा थोडक्यात
https://youtu.be/xzUCzCdKjCQ