वाळूज महानगर (औरंगाबाद); पुढारी वृत्तसेवा : शरणापूर येथील भांगसी माता गडाकडे फिरण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २१) दुपारी उघडकीस आली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. शिवराज संजय पवार ( वय १७) प्रतीक आनंद भिसे ( वय १५) आणि तिरुपती मारोती कुदळकर (वय १५, सर्व रा. सारा संगम फेज -१, बजाजनगर) अशी शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
याविषयी अधिक माहिती अशी, शिवराज पवार, प्रतीक भिसे व तिरुपती कुदळकर हे तिघे शाळकरी मित्र रविवारी सुट्टी असल्याने दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दोन सायकलवरून शरणापूर येथील भांगसी माता गडावर फिरण्यासाठी गेले होते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या शेततळ्यात पोहोण्यासाठी उतरले होते. याच दरम्यान त्यांनी आपल्या जवळच्या सायकली शेत तळापासून जवळपास १५० मीटर अंतरावर उभ्या करून ठेवल्या होत्या. शेततळ्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघा मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी धाव घेत घटनेची माहिती अग्निशामन विभागाला दिली. अग्निशामन दलाचे अब्दुल अजीज, हरिभाऊ घुगे, राजू निकाळजे, इसाक शेख, दिपक गाडेकर आदींनी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर तिघा मुलांचे मृतदेह शेततळ्यातील पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.
पोलिसांनी शिवराज पवार, प्रतीक भिसे व तिरुपती कुदळकर यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?