Latest

पालघर : चारोटी येथे भरधाव ट्रेलरने दुचाकीवरील तिघांना चिरडले, १०० मीटरपर्यंत फरफटत नेले

दीपक दि. भांदिगरे

डहाणू : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे दुचाकीवरील ३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथील एशियन पेट्रोलपंपासमोर आज सकाळी एका भरधाव ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या धडकेत ३ जणांचा जागीच मृत्यू झाला.

ट्रेलरने धडक देऊन दुचाकीला जवळपास १०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त करीत सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण ठेवणार्‍या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर ते अच्छाड हा १३० किमी अंतराचा पट्टा रोज होणार्‍या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास चारोटी येथील एशियन पेट्रोलपंपासमोरील ब्लॅक स्पॉट असलेल्या क्रॉसिंगवर दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी रस्ता ओलांडताना गुजरातहून मुंबईकडे जाणार्‍या भरधाव वेगातील अवजड ट्रेलर (डीडी-०१ एच-९१५८) ने दुचाकीला (एमएच-४८ एजे-५६३५) जोरदार धडक देऊन दुचाकीसह तिघांना जवळपास १०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले नेले.

ट्रेलरने चिरडल्यामुळे दुचाकीवरील काकड्या रांधे (वय ४४ वर्षे), स्वप्नील रांधे (वय २४ वर्षे) आणि विष्णू कान्हात (वय २८ वर्षे) या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून मयत तिघेही तलासरी तालुक्यातील सुत्रकार येथील राहणारे आहेत. अपघात झाल्याचे समजताच जवळच असलेल्या महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून तिघांचेही मृतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. या अपघातप्रकरणी ट्रक चालक यास कासा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सुरक्षित उपाययोजना नसल्याने जात आहेत बळी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आय.आर.बी. या ठेकेदार कंपनीने सुरक्षित उपाययोजना केल्या नसल्यामुळे तसेच अनेक कामे अर्धवट ठेवल्यामुळे रोज अपघात होत आहेत. उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतरदेखील प्रशासनाला अद्याप जाग आलेली दिसत नाही. चारोटी जवळील एशियन पेट्रोलपंपावर जाण्यासाठी अनधिकृत क्रॉसिंगचे ठिकाण हे ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी आत्तापर्यंत जवळपास ५० हून अधिक जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. चारोटी नाका येथून पेट्रोलपंपावर इंधन भरायला जाण्यासाठी असलेल्या सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण ठेवल्यामुळे वाहनचालकांना नाईलाजाने धोकादायक क्रॉसिंग ओलांडून अथवा विरुद्ध दिशेने वाहने चालवावी लागतात.

चारोटी नाका येथून उड्डाणपूलाचा आणि महालक्ष्मी बाजूने असलेला तीव्र उतार हे अपघातांचे प्रमुख कारण ठरत आहे. या ठिकाणी सर्व्हिस रोड बनविण्यासाठी चारोटी ग्रामपंचायत यांच्याकडून वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार कंपनी आणि जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT