वॉशिंग्टन : सर्वसामान्यपणे पाच-ते सहा दिवस काम केल्यानंतर बहुतेक लोक वीकेंड साजरा करतात. पृथ्वीप्रमाणे अंतराळातही असेच घडते. तेथेही अंतराळयात्री पाच दिवस काम करतात आणि दोन दिवस विश्रांती घेतात. मात्र, या लोकांना अंतराळात विश्रांती घेण्यासाठी फारच कमी वेळ मिळतो. म्हणजेच अंतराळात विश्रांती घेण्याच्या संधी आणि पर्याय फारच कमी मिळतात. मग खगोलशास्त्रज्ञ अंतराळात नेमकी कशी विश्रांती घेतात? असा प्रश्न उपस्थित होतो.
पृथ्वीपासून सुमारे 450 कि.मी. उंचावर असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अनेक अंतराळयात्री कार्यरत आहेत. हे लोक विश्रांती म्हणून अंतराळ स्थानकाच्या खिडकीतून निळ्याशार पृथ्वीचे निरीक्षण करत असतात. हे लोक पृथ्वीवरील सर्वकाही पाहात असतात. यामध्ये वादळ, चक्रीवादळ, नॉदर्न लाईट्स, वीज कोसळणे, सूर्योदय व सूर्यास्त अथवा मोठ-मोठ्या नकाशांमध्ये होत असलेले बदल हे लोक पाहत असतात. हे अंतराळ स्थानक पृथ्वीभोवती एक दिवसाला 16 फेर्या मारत असते.
ज्यावेळी अंतराळ स्थानकातील शास्त्रज्ञांना रिकामा वेळ मिळतो. त्यावेळी ते मिशन कंट्रोल सेंटरमधील आपल्या सहकार्यांशी चर्चा करतात. याशिवाय ते आपले कुटुंबीय आणि मित्रांशी गप्पा मारतात. ही सुविधा अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा' देत असते. चर्चा करण्यासाठी हे लोक ई-मेल्स, इंटरनेट फोन, हॅम रेडिओ अथवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर करत असतात. तसेच हे खगोलशास्त्रज्ञ अंतराळ स्थानकावर असलेल्या दोन लायब्ररींमधील पुस्तकेही वाचत असतात.
हेही वाचा