वॉशिंग्टन; पुढारी ऑनलाईन : वेगाने पसरणाऱ्या 'मंकीपॉक्स'मुळे (Monkeypox Health Emergency) अमेरिकेने गुरुवारी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. आता आरोग्य आणीबाणीच्या माध्यमातून या आजाराचा सामना करण्यासाठी सरकार आणि आरोग्य विभागाला अनेक अभूतपूर्व अधिकार मिळाले आहेत. या घोषणेमुळे सर्व यूएस राज्यांना मंकीपॉक्स सारख्या संसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी फेडरल निधी आणि संसाधने उभारण्यास मदत होईल. आतापर्यंत, अमेरिकेत 7,100 हून अधिक लोकांना मंकीपॉक्सने बाधित केले आहे. ताप, अंगदुखी, थंडी वाजून येणे, थकवा येणे, अंगावर अनेक ठिकाणी फोड येणे ही या आजाराची लक्षणे आहेत.
मंकीपॉक्सविरोधी लसींच्या उपलब्धतेवर अमेरिकेत गोंधळ उडाला आहे. अनेक ठिकाणी या लसींचे विषम पद्धतीने वाटप झाल्याची टीका अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनावर करण्यात आली आहे. आता या टीकेनंतर या प्रकरणावर सारवासारव करण्यासाठी अमेरिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख जेवियर बेसेरा म्हणाले, "आम्ही प्रत्येक अमेरिकन व्यक्तीला मंकीपॉक्सला गांभीर्याने घेण्याचे आवाहन करत आहोत. तसेच या विषाणूवर मात करण्यासाठी आम्ही पुढील आव्हानांसाठी सज्ज आहोत."
न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को सारख्या मोठ्या शहरांमधील आरोग्य केंद्रांचे म्हणणे आहे की, त्यांना या दोन डोसच्या लसी पुरेशा प्रमाणात मिळाल्या नाहीत. काहींना पहिल्या डोसचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी दुसरा डोस देणे बंद करावे लागले. यापूर्वी, व्हाईट हाऊसने सांगितले की त्यांनी 11 कोटींहून अधिक डोस पाठविण्यात आहेत.