file photo  
Latest

भाजपचे गोव्यात सलग जास्त काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे

निलेश पोतदार

पणजी : पुढारी व्रुतसेवा भारतीय जनता पक्षाचे नेते व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गोव्यात भाजपचे मुख्यमंत्री म्हणून सलग जास्त काळ मुख्यमंत्री पदी राहणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. एकुण मुख्यमंत्री कार्यकाळात ते चौथ्या क्रमांकावर आहेत. प्रतापसिंह राणे, दयानंद बांदोडकर व मनोहर पर्रिकर नंतर जास्त काळ मुख्यमंत्रीपद डॉ. सावंत यांनी भूषवले आहे.

१७ मार्च २०१९ रोजी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण ? असा प्रश्न निर्माण झाला होता. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी तेव्हा सभापती असलेले डॉ. प्रमोद सावंत यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली.
२०१७ ते २०२२ च्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा विधानसभा निवडणूक झाली, ज्यात डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपला अनपेक्षित असे यश मिळाले. भाजपला २० जागा मिळाल्या. त्याही कुठल्याही पक्षांशी युती न करता. पर्रीकर यांच्या काळात भाजपला एकदा २१ जागा मिळाल्या होत्या. मात्र त्यावेळी मगो सोबत भाजपची युती होती. त्यामुळे २०२२ चे २० जागांचे डॉ. सावंत यांचे यश लक्षवेधी ठरते.

डॉ. प्रमोद सावंत यांनी १९ मार्च २०१९ पासून आतापर्यंत सलगपणे मुख्यमंत्रिपदी राहुन डॉ. सावंत यांनी गोव्यातील भाजपचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान मिळवला आहे. आज त्यांना सलग मुख्यमंत्री म्हणून ४ वर्षे आणि १०२ दिवस पूर्ण होत आहेत.
यापूर्वी भाजपचा नेता मुख्यमंत्री म्हणून सलगपणे एवढा कालावधी राहिला नव्हता. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ३ जून २००२ ते २ फेब्रुवारी २००५ पर्यंत सलगपणे ४ वर्षे १०१ दिवस मुख्यमंत्री होते. त्यांचे सरकार पाडल्यानंतर काँग्रेसचे सरकार आले. काँग्रेसचे शासन २०१२ पर्यंत राहिले.

मार्च २०१२ मध्ये भाजप पुन्हा सत्तेत आली. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाले. पण यावेळीही त्यांच्या नशिबात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा योग नव्हता. केंद्रात चांगल्या नेत्यांची गरज होती, त्यामुळे त्यांना दिल्लीत बोलावणे आले. ९ मार्च २०१२ ते ८ नोव्हेंबर २०१४ पर्यंत ते गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी होते. नोव्हेंबरमध्ये ते दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून गेले. २०१२ ते ८ नोव्हेंबर २०१४ पर्यंत पर्रीकर २ वर्षे आणि २४४ दिवस मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर भाजपने ज्येष्ठ नेते प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मुख्यमंत्रिपदी नियुक्त केले. पार्सेकर ८ नोव्हेंबर २०१४ ते ११ मार्च २०१७ पर्यंत गोव्याचे मुख्यमंत्री होते. ते एकूण २ वर्षे १२३ दिवस गोव्याचे मुख्यमंत्री राहिले. २०१७ च्या निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला, ज्यात अनेक तत्कालीन मंत्री पराभूत झाले. पार्सेकरांनाही त्या लाटेचा फटका बसला. पण त्या निवडणुकीत काँग्रेसने जास्त जागा मिळवूनही सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारी जमवाजमव करण्यात दिरंगाई केली. काँग्रेसच्या मदतीने जिंकून आलेल्यांनाही काँग्रेसशी बेईमानी केली आणि भाजपने सत्ता स्थापनेचा डाव टाकला. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजपने पुन्हा सत्ता स्थापन केली.

पर्रीकर दिल्लीच्या राजकारणातून महत्त्वाचे पद सोडून गोव्यातील सत्तेच्या मोहापायी इथे आले. १४ मार्च २०१७ ते १७ मार्च २०१९ पर्यंत ते गोव्याचे मुख्यमंत्री राहिले. सुमारे २ वर्ष आणि ३ दिवस ते मुख्यमंत्रिपदी होते. दुर्दैवाने त्यांना तो कार्यकाळही पूर्ण करता आला नाही. कॅन्सरने पर्रीकरांची झुंज सुरू झाली. १७ मार्च २०१९ रोजी पर्रीकर यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर मुख्यमंत्री झालेले डॉ. प्रमोद सावंत हे तेव्हापासून सलगपणे मुख्यमंत्री राहिले. त्यामुळे आज त्यांनी गोव्यातील भाजपचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेला नेता असा विक्रम केला.

गोव्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री…

१९ डिसेंबर १९६१ साली गोवा पोर्तुगीजांच्या सत्तेतून मुक्त झाला. १९६३ साली केंद्रशासित प्रदेश असलेल्या गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर झाले. केंद्रशासित प्रदेशाच्या काळात गोव्यात तीन व्यक्तींनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. भाऊसाहेबांच्या निधनानंतर १२ ऑगस्ट १९७३ साली त्यांच्या कन्या शशिकलाताई काकोडकर मुख्यमंत्री झाल्या. १६ जानेवारी १९८० मध्ये प्रतापसिंग राणे मुख्यमंत्री झाले. १९८७ मध्ये राणेच घटक राज्यानंतरचे पहिले मुख्यमंत्री ठरले. तेव्हापासून चर्चिल आलेमाव, लुईस प्रोत बार्बोझा, रवी नाईक, डॉ. विल्फ्रेड डिसोझा, लुईझिन फालेरो, फ्रा​न्सिस सार्दिन, मनोहर पर्रीकर, दिगंबर कामत, लक्ष्मीकांत पार्सेकर असे नेते मुख्यमंत्रीपदी आले. घटक राज्यानंतर आतापर्यंत ११ व्यक्ती मुख्यमंत्रीपदी आल्या.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT