पुणे : पुढारी वृत्तसेवा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या 17 मे पासून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठीचा पहिला भाग तर दुसरा भाग दहावीचा निकाल लागल्यानंतर भरता येणार आहे. यंदा प्रवेशाच्या नियमित तीन आणि एक विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. तर एफसीएफएस फेरीऐवजी प्रतीक्षा यादी लावण्यात येणार असल्याचे संचालनालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
सन 2017-18 पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येत आहेत. सन 2021-22 ची अकरावी प्रवेश प्रक्रिया 31 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण झालेली आहे. तर राज्य मंडळाची दहावीची परीक्षा 4 एप्रीलला समाप्त झालेली आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांसाठी सन 2022-23 मधील प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी विभागीय उपसंचालकांना दिलेल्या सुचनांनुसार, अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रक्रिया 2022-23 साठी पूर्वतयारी त्वरीत सरु करण्यात यावी. त्यासाठी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून घेऊन त्यानुसार नियोजन करावे. विद्यार्थी, पालक यांचेसाठी उद्भोदन वर्ग आयोजित करावेत, शाळा मार्गदर्शन केंद्रांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाचे बिगुल वाजले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कागदपत्रांबाबत सूचना द्या
मागासवर्गीय अथवा विशेष प्रवर्गात समाविष्ट होणार्या विद्यार्थ्यांना त्यांना लागू असलेल्या आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अगोदरच काढून ठेवणेबाबत जागृत करावे. त्यासाठी, सबंधित महसूल यंत्रणेस विद्यार्थ्यांना कागदपत्रे वेळेत मिळवून देण्यासाठी विशेष मोहिम राबविणेबाबत विनंती करणे, माध्यमिक शाळांनी नववी-दहावीमधील विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करून शाळेत असतांनाच अशी कागदपत्रे विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा उपाययोजना कराव्यात अशा सूचना देखील पालकर यांनी दिल्या आहेत.
हे ही वाचलं का ?