वर्षा कांबळे
पिंपरी(पुणे) : पिंपरी -चिंचवड शहरात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी असल्याचे वैद्यकीय विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शहरामध्ये पाच वर्षात 76 हजार 308 मुले, तर 69 हजार 69 मुलींची नोंद झाली आहे. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी शहरात प्रबोधन करण्याची गरज आहे.
वैद्यकीय विभाग व इतर यंत्रणांवर मुलीच्या जन्मदराबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. काही वर्षांपूर्वी सोनोग्राफी सेंटरमध्ये लिंगनिदान चाचणी केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. लिंग निदान चाचणी, स्त्री भ्रूणहत्या केल्यास मोठ्या शिक्षेची तरतूद आहे, असे फलक प्रत्येक सोनोग्राफी सेंटरमध्ये लावलेले आहेत. त्यावर किती कारवाई होते, हा संशोधनाचा भाग आहे.
शहरात लिंगनिदान चाचणी होत नाही. शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञ व सोनोग्राफी सेंटरचे तज्ज्ञ याबाबत अशा कोणत्याही गोष्टी आम्ही आमच्या सेंटरमध्ये अथवा हॉस्पिटलमध्ये करीत नाही, असे ठामपणे सांगत असले तरीही शहरातील मुलींचा जन्मदराचा आकडा काळजी करायला लावणारा आहे. दरवर्षी मुलींच्या जन्मदरात अशीच घट होत राहिल्यास भविष्यात सामाजिक संतुलनाला मोठा फटका बसू शकतो.
लोकांनी मुलींच्या जन्माविषयी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. मुलींचे साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे. परंतु मुलींच्या जन्माचे स्वागत अत्यल्प प्रमाणात केले जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले कुटुंबही आपल्या मुलीला नोकरदार चांगल्या कुटुुंबातील मुलगा मिळावा, यासाठी लाखो रुपये हुंडा, सोने, चांदी देण्यासाठी तयार होतो. अशा प्रकारामुळेच मुली नकोत, अशी मानसिकता बळावत आहे.
ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यासाठी हुंडापध्दत मोडीत काढायला पाहिजे. मुलीचा गर्भ जन्माला घालण्याचा निर्णय मातेचाच असायला हवा. मात्र, मातादेखील कुटुंबातील व्यक्तीच्या दडपणाखाली येतात. त्यामुळे त्यांनाही आपल्याला मुलगी नकोच असे वाटते. विशेष करून ज्या महिलांना पहिली मुलगी असते त्यांना दुसर्यावेळी मुलगाच हवा. नाहीतर घरच्यांचा कायमच रोष पत्करावा लागेल, ही भीती आजही आहे.
रुग्णालयात अशा बर्याच केसेस येतात की, ज्यामध्ये सासू-सासर्यांना मुलगाच हवा असतो. एका महिलेला तिसर्या वेळेस मुलगी झाल्याच्या कारणावरुन सासूनेच तिला घराबाहेर काढले अशा घटना घडतात. स्त्रियाच मुलाचा अट्टहास धरताना दिसतात. त्यांना समुपदेशन केले तरी ते आपली मनोवृत्ती बदलत नाहीत. आज सुशिक्षित दांपत्यांचीदेखील मनोवृत्ती बदलण्याची गरज आहे. त्यांना एकच मूल हवे असते आणि तोदेखील मुलगा हवा असतो. मग त्यातून मुलींना जन्म न देण्याचा प्रकार घडतो.
पाच वर्षातील मुलामुलींची आकडेवारी
वर्ष मुले मुली
2018 14413 12755
2019 14680 13314
2020 13631 12671
2021 9656 8886
2022 17432 15620
2023 6496 5823
(मे 23 पर्यंत)
एकूण 76308 69069
शहरातील रुग्णालयांमध्ये शहराबाहेरील महिलांचीदेखील प्रसूती होते. त्यामुळे आकडेवारीमध्ये तफावत दिसून येते. नेमकी संख्या ही जिल्ह्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
-डॉ. लक्ष्मण गोफणे,
आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.
हेही वाचा