ठाणे : पुढारी वृत्तसेवा; मुंब्रा कौसा परिसरातील मुघल पार्क या इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या भगांरच्या गाळ्यात आज पहाटे ६ च्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे या इमारतीबरोबरच आजूबाजूच्या इमारतीच्याही काचा फुटल्या. तर या परिसरातील वाहनांचेही नुकसान झाले. या घटनेत तिघे किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर स्फोटामुळे सदरची इमारत तसेच बाजूच्या दोन इमारती धोकादायक झाल्याने या इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. (Thane News)
मुंब्र्यातील मस्जिद रोड, चांद नगर, कौसा या ठिकाणी मुघल पार्क ही तळ अधिक ४ मजल्यांची इमारत आहे. या इमारतीमध्ये एकूण २५ रुम तसेच ४ दुकानांचे गाळे आहेत. तळ मजल्यावरील गाळा नं. ३ या भंगाराच्या दुकानामध्ये ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा आज पहाटे 6 च्या दरम्यान स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी , आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पीकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे विभागीय अधिकारी व जवान ०१- फायर वाहनासह तसेच टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी, मुंब्रा पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी ०२ – रुग्णवाहिकेसह यांनी धाव घेऊन तात्काळ बचाव कार्य सुरू केले. यामध्ये तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. (Thane News)
जखमींपैकी अजहर शेख यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना उपचाराकरिता बिलाल रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. अर्षू सय्यद ( १० वर्षे ) हाताला दुखावत झाली आहे. तर जिनत मुलानी ( ५० वर्षे) यांच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली. यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे समोरील फरिदा बाद बिल्डिंग(तळ+५) या बिल्डिंगच्या काही घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत व तळमजल्यावर असलेल्या ८ दुकानांच्या शेटरचे व इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. (Thane News)
स्फोट झाल्याने सदर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील भिंतीला तडे गेले असून धोकादायक स्थितीत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मुघल पार्क बिल्डिंग ही रिकामी करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत धोकापट्टी लावून बॅरिगेटिंग करण्यात आले आहे व पुढील कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभाग व अतिक्रमण विभागामार्फत सुरू असल्याची माहिती अपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.