कल्याण; पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाला पोलिसांकडून तडीपारची नोटीस बाजावण्यात आल्यानंतर त्याच्या मदतीला शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर धावले आहेत. कल्याण मुरबाड शिवसेना जिल्हा प्रमुख विजय साळवी यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी आमदार भोईर यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. ठाकरे-शिंदे गटातील वाद विकोपाला गेला असताना या घटनेची शहरात चर्चा सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे कल्याण महानगर प्रमुख आणि कल्याण मुरबाड शिवसेना जिल्हा प्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपारची नोटिस पाठविण्यात आली होती. साळवी यांना पोलिसांकडून त्यांच्या प्रतिउत्तरासाठी वेळही दिला होता. त्यानंतर साळवी यांनी कारवाई सूडबूद्धीने होत असल्याचा आरोप केला. तसेच शेकडो समर्थकांसह पोलिस अधिक्षक कार्यालयात जाऊन जबाब नोंदविला.
पोलिसांत हे प्रकरण सुरु असताना थेट शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांनी शिंदे गटातील नगरसेवकांसोबत डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी साळवी यांच्या विरोधात कोणतीही अन्यायकारक कारवाई होऊ नये, अशी विनंती केली.
यावेळी आमदार विश्वनाथ भोईर माजी नगरसेवक मोहन उगले माजी नगरसेवक रवी पाटील, सुनील वायले, जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, श्रेयस समेल उपस्थित होते. या वेळी विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की, विजय साळवी आणि आमचे पारिवाराचे चांगले संबंध आहे. आम्ही दोघांनी एकत्र काम केले आहे. ही कारवाई सूडबुद्धीने केलेली नाही. त्यांच्या विरोधात राजकीय गुन्हे दाखल आहेत. विजय साळवी यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, याबाबत पोलिसांनी दक्षता घ्यावी. असे ते म्हणाले. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा :