डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा: कल्याणात भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे वैर पोलिस ठाण्यात झालेल्या फायरवॉरमधून चव्हाट्यावर आले आहे. एकीकडे आमदार गणपत गायकवाड सद्या न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले शहरप्रमुख महेश गायकवाड उपचारानंतर घरी येण्याच्या वाटेवर आहेत. त्यातच आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या केबल कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याने शहरात सुडाचे राजकारण डोके वर काढत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. Thane News
मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या चौघा हल्लेखोरांना अटक करून कोठडीचा रस्ता दाखवला आहे. Thane News
आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू तथा माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांचे कल्याण पूर्वेकडील तिसाई चौक परिसरातील जरीमरी व्हिजन नावाचे कार्यालय आहे. सोमवारी ( दि. १९) संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास या कार्यालयाच्या समोर पार्क केलेल्या दुचाकीला अनोळखी तरूण चावी लावत असल्याचे पाहताच दुचाकीचा मालक सागर गायकवाड याने त्याला हटकले. त्याचा राग आल्याने नशेत असलेल्या या तरुणाने कार्यालयात घुसून सागरला शिवीगाळ करत ठोसा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याने आपल्या आणखी ५ साथीदारांना कार्यालयाजवळ बोलावून घेतले. सागरला सोडविण्यासाठी कार्यालयातील कर्मचारी प्रफुल्ल भिसे हा मध्ये पडताच त्यालाही या टोळक्याने मारहाण करून जखमी केले.
नाक, तोंड आणि मानेवर मारहाण केल्यानंतर हल्लेखोरांपैकी कुणीतरी कार्यालयाच्या काचा तर फोडल्याच, शिवाय फुटलेल्या काचेच्या तुकड्याने सागरच्या मनगटावर वार करत त्याला जखमी केले. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या प्रकरणी जखमी सागर गायकवाड याच्या तक्रारीवरुन कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौघांना अटक केली. स्वरूप सोरटे, मयूर चव्हाण, व्यंकटेश कोणार आणि करण गुप्ता अशी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे असून उर्वरित दोघांची ओळख पटविली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान हा वाद आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यातील नसून कार्यकर्त्यांनी शांत रहावे, असे आवाहन कोळसेवाडी पोलिसांनी केले आहे. आमदार गायकवाड यांच्या भावाच्या तोडफोड झालेल्या कार्यालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
हेही वाचा