गायकवाड गोळीबार प्रकरण : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या ड्रायव्हरला अटक | पुढारी

गायकवाड गोळीबार प्रकरण : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या ड्रायव्हरला अटक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील आणखी एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रँचच्या भिवंडी युनिटने अहमदनगर येथून शनिवारी (दि. ११) अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी आमदार गायकवाड यांचा ड्रायव्हर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रणजित यादव असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अटकेनंतर गोळीबारकांडातील अटक आरोपींची एकूण संख्या पाच झाली आहे.

शुक्रवारी (दि. 2 फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास हिललाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या गोळीबारकांडानंतर आमदार गणपत गायकवाड, खासगी अंगरक्षक हर्षल केणे, आमदारांचा प्रसारमाध्यम विभाग सांभाळणारे संदीप सरवणकर, विक्की गणोत्रा या चार जणांना क्राईम ब्रँचने यापूर्वीच अटक केली आहे.

आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी कल्याण पूर्वचे शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख महेश गायकवाड यांचे समर्थक चैनू जाधव यांच्या जबानीवरून हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गोळीबारकांडात एकूण सात ज्ञात आणि त्यांच्या अज्ञात साथीदारांना आरोपी करण्यात आले आहे.

क्राईम ब्रँचची खास पथके गोळीबारकांडातील फरार आरोपींचा शोध घेत आहेत. 14 फेब्रुवारीला आमदार गायकवाड यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आहे. तत्पपूर्वी सर्व आरोपींना अटक करण्याचे तपास पथकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणातील आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड आणि नागेश बडेकर हे आरोपी अद्याप हाती लागले नाहीत. क्राईम ब्रँचकडून त्यांचा कसोशीने शोध सुरू आहे. मागील नऊ दिवसांपू्वी आमदार गणपत गायकवाड यांनी राजकीय वैमनस्य आणि जमिनीच्या वादातून शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्येच बेछूट गोळीबार केला होता. यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रकृती आता सुधारत असून त्यांना कधीही डिस्चार्ज मिळू शकतो, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

विशेष म्हणजे आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचा प्रतिस्पर्धी महेश गायकवाड या दोघांची जनसंपर्क कार्यालये आमनेसामने नसली तरी फर्लांगभर अंतरावर आहेत. आमदार गणपत गायकवाड यांच्या निवासस्थानासह त्यांचे जनसंपर्क कार्यालय, तसेच शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी गोळीबारकांडाशी संबंधित राजकीय आणि गुन्हेगारी क्षेत्रातील मंडळींवर करडी नजर ठेवली आहे.

Back to top button