पुढारी ऑनलाईन : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतासह थंडीने गारठला असून या भागात दाट धुके व कडाक्याची थंडी आहे. पुढचे काही दिवस तापमान घसरून देशातील अन्य भागात थंडी पुन्हा वाढणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. पुढच्या दोन दिवसात उत्तर भारतात २ ते ३ अंशापर्यंत तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पंजाब, हरियाणा दिल्ली आणि संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये थंडीचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर उर्वरित भारतातील महाराष्ट्रातील विदर्भासह, जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, तेलंगणा, मेघालय, मिझोरम, आसाम या राज्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे तापमानाचा पारा घसरणार असल्याचा अंदाज व्यक्त वर्तवण्यात आला आहे. यामुळे पुढच्या दोन दिवसात या भागात कडाक्याची थंडीसह धुके पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
उत्तर भारतात सोमवारी सलग पाचव्या दिवशी तीव्र थंडीची लाट कायम राहिली. विक्रमी कमी तापमान आणि खराब दृश्यमानतेमुळे शहरांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे, त्यामुळे दळणवळणावर परिणाम झाला आहे आणि शाळांची सुट्टी वाढवण्यास भाग पाडले आहे.
१० जानेवारी रोजी जवळ येत असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये 2 दिवसांनंतर किमान तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, उत्तर राजस्थान, दक्षिण हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पूर्व मध्य प्रदेशात ९ तारखेला थंडीची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.