पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India IND vs AUS : दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरात पहिल्याच पराभवानंतर कांगारू संघ बॅकफूटवर गेला आहे. आता दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवरील टीम इंडियाचे रेकॉर्ड पाहून ऑस्ट्रेलियन संघाला घाम फुटल्याची चर्चा रंगली आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील दुस-या कसोटीला 17 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय संघाचे (Team India) रेकॉर्ड खूप चांगले आहे. टीम इंडियाने गेल्या 36 वर्षांपासून या स्टेडियमवर एकही सामना गमावलेला नाही. या मैदानावर भारतीय संघाचा शेवटचा पराभव 1987 मध्ये वेस्ट इंडिजकडून झाला होता. त्यानंतर टीम इंडियाने अनेक मोठ्या संघांना दिल्लीच्या या प्रसिद्ध मैदानात चितपट केले आहे. 2017 मध्ये अखेरच्या वेळी टीम इंडिया या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळली होती, जो अनिर्णित राहिला होता.
अरुण जेटली स्टेडियमवरील टीम इंडियाचे (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्धचे रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 7 सामने झाले आहेत. त्यापैकी भारतीय संघाने 3 तर ऑस्ट्रेलियन संघाने 1 सामन्यात विजय मिळवला आहे. दरम्यान, या मैदानावर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. या मैदानावर 2013 मध्ये भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाशी टक्कर झाली होती. तो सामना टीम इंडियाने 6 विकेट्सने जिंकला होता. तर ऑस्ट्रेलियाने 1959 मध्ये एकमेव विजय नोंदवला होता. अशा परिस्थितीत हे रेकॉर्ड पाहून ऑस्ट्रेलियन संघ नक्कीच चिंतेत असेल.
दुसरीकडे, अरुण जेटली स्टेडियम हे विराटसाठी लकी आहे. त्याचे हे घरचे मैदान असून येथील त्याचे रेकॉर्ड अप्रतिम आहे. या मैदानावर विराटने एकूण 3 सामने खेळले असून त्याने 77.83 च्या सरासरीने 6 डावात 467 धावा फटकावल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 243 आहे. अशा परिस्थितीत विराट कसोटी क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल यात शंका नाही.
दिल्लीतील मैदानावर आतापर्यंत 34 कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सचिन तेंडुलकरने या मैदानावर सर्वाधिक धावा केल्या आहेत, तर अनिल कुंबळेने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. सचिनने दिल्लीत खेळल्या गेलेल्या 10 कसोटी सामन्यांच्या 19 डावांमध्ये 42.16 च्या सरासरीने सर्वाधिक 759 धावा केल्या आहेत. दिलीप वेंगसाकर यांनी या मैदानावर सर्वाधिक चार शतके झळकावली आहेत. कुंबळेने सात सामन्यांत 58 बळी घेतले असून 50 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. सध्याच्या गोलंदाजांमध्ये आर. अश्विनने चार सामन्यांत 27 बळी घेतले आहेत.