पुणे : पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तानला सलग आठव्यांदा चारीमुंड्या चीत केल्यानंतर टीम इंडिया पुढील सामना खेळण्यासाठी पुण्यामध्ये दाखल झाली आहे. पुण्यामध्ये लोहगाव विमानतळावर जल्लोषी स्वागत करण्यात आले. टीम इंडियाचा पुढील सामना बांगलादेशविरुद्ध होत आहे. 19 ऑक्टोबर रोजी हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. बर्याच कालखंडानंतर पुण्यात सामना होत असल्याने सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दुसरीकडे, विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारताचा अजिंक्यरथ सुरूच आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी सामना खेळला गेला.
या सामन्यात भारतीय संघाने 30.3 षटकांत 7 विकेट राखून सामना जिंकला. विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 8 सामने झाले आहेत. प्रत्येक वेळी भारतीय संघ जिंकला आहे. भारतीय संघ वर्ल्ड कपमधील चौथा सामना बांगलादेशविरुध्द खेळणार आहे. गुरुवार दि. 19 ऑक्टोबर रोजी गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.