पुढारी ऑनलाईन डेस्क : हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडला टी-20 मालिकेत पुन्हा पराभूत केले आहे. टीम इंडियाने बुधवारी झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 168 धावांनी शानदार विजय नोंदवला. युवा फलंदाज शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. तर पंड्याने किवींच्या फलंदाजीला सुरुंग लावत चार विकेट पटकावल्या. या विजयासह पंड्याने आपल्या नेतृत्वाखाली टी-20 मालिका जिंकण्याचा चौकार लगावला आहे. त्यामुळे पंड्याची ही यशस्वी लामगिरी रोहित शर्माच्या अडचणीत वाढवेल अशा चर्चांना उधान आले आहे.
मागील वर्षी दुबईतील आशिया कप आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पराभवानंतर टीम इंडियाच्या नेतृत्वात बदल करण्यात आला. वनडे फॉरमॅटचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-20 संघातून विश्रांती देण्यात आली. निवडकर्त्यांनी हार्दिक पंड्यावर (Hardik Pandya) विश्वास दाखवला आणि रोहितच्या जागी त्याच्याकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. हार्दिकने ही आपल्यावरचा विश्वास सार्थ ठरवला. टी-20 विश्वचषकानंतर त्याने भारताला सलग तीन टी-20 मालिका जिंकून दिल्या.
हार्दिकच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या या चमकदार कामगिरीनंतर रोहित शर्माला पुन्हा टी-20 संघाचे कर्णधारपद मिळणे कठीण झाले आहे. हार्दिक आता भारतीय संघासाठी टी-20 संघाचे नेतृत्व करेल अशी जोरदार चर्चा सुरू आहे. कदाचित त्याला 2024 च्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधीही देण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाने गेल्या वर्षी आयर्लंड आणि न्यूझीलंडला टी-20 मालिकेत पराभूत केले. त्या मालिकेत केन विल्यमसन न्यूझीलंडचा कर्णधार होता. त्यानंतर 2023 च्या सुरुवातीला हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेचा 2-1 आणि न्यूझीलंडचा सुद्धा 2-1 असा पराभव केला. किवींविरुद्धच्या मालिकेत तर हार्दिक पंड्या हा प्लेअर ऑफ टुर्नामेंटचा मानकरी ठरला.