Latest

Semiconductor Chips : टाटा समूह २०२६ पर्यंत सेमीकंडक्टर चिप्सचे उत्पादन सुरू करणार

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : टाटा समूह २०२६ पर्यंत गुजरात, आसाम प्लांटमधून सेमीकंडक्टर चिप्सचे व्यावसायिक उत्पादन सुरू करणार आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी आज (दि. १३) पायाभरणी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आयोजित इंडिया टेकएड कार्यक्रमात तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची (Semiconductor Chips) पायाभरणी केली आहे.

इको-सिस्टम मजबूत करण्यासाठी देशात सेमीकंडक्टर उत्पादनासाठी (Semiconductor Chips) युनिट्स स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १.२५ लाख कोटी रुपयांचे तीन प्रकल्पांची पायाभरणी केली. सेमीकंडक्टर उद्योगावर भर देण्याच्या धोरणामुळे देशातील हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन सारख्या क्षेत्रातही रोजगार निर्मिती होणार आहे. सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत गुजरातमधील धोलेरा, साणंद आणि आसाममधील मोरीगाव येथे सेमीकंडक्टर उत्पादन युनिट स्थापन केले जात आहेत.

२०२६ पर्यंत सेमीकंडक्टर चिप्सचे उत्पादन सुरू होणार

टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी सांगितले की, "टाटा समूहाला आशा आहे की गुजरात आणि आसाममधील पायाभरणी झालेल्या प्लांटमध्ये सेमीकंडक्टर चिप्सचे (Semiconductor Chips) व्यावसायिक उत्पादन २०२६ मध्ये सुरू होईल. सामान्यतः यासाठी चार वर्षे लागतात, परंतु आमचे ध्येय २०२६ मध्ये चिप तयार करणे आहे. आसाम युनिटमधून २०२६ च्या सुरुवातीस व्यावसायिक उत्पादन सुरू करू शकतो," असा विश्वास त्यांनी केला.

"आम्ही यामाध्यमातून ५० हजार नोकऱ्या निर्माण करू. ही फक्त एक सुरुवात आहे. आज सेमीकंडक्टर बनवण्याचा आमचा प्रवास सुरू झाला आहे. पहिल्यांदाच भारताकडे चिप्सची मागणी पूर्ण करण्याची क्षमता असेल," असेही चंद्रशेखरन म्हणाले.

टाटा समूहाकडून दोन प्लांटची उभारणी

तीन नवीन चिप प्लांटपैकी (Semiconductor Chips) दोन गुजरातमध्ये आणि एक आसाममध्ये स्थापित केले जात आहेत. टाटा समूह या तीनपैकी दोन नवीन प्लांट उभारत आहे. आत्मनिर्भर आणि मेक इन इंडिया योजनेचा एक भाग म्हणून, सरकारने इलेक्ट्रॉनिक्ससह विविध क्षेत्रातील भारतीय उत्पादकांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, निर्यात वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

"सेमीकंडक्टर (Semiconductor Chips) हे डिजिटल उत्पादनांसाठी पायाभूत उद्योग आहेत. कोणत्याही डिजिटलसाठी सेमीकंडक्टर मूलभूतपणे आवश्यक आहे. त्यामुळे, भारतासाठी सेमीकंडक्टर राष्ट्र बनणे खूप महत्त्वाचे आहे. टाटा समूह यासाठी सक्षम झाला आहे. आसाममधील पहिले सेमीकंडक्टर फॅब आणि पहिले स्वदेशी असेंब्ली युनिट देखील स्थापित केले आहे," असेही टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी सांगितले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT