संग्रहित फोटो  
Latest

अमली पदार्थांचे रॅकेट उखडण्यासाठी टास्क फोर्स

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरात अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यात एका स्वतंत्र टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. राज्याचे पोलिस महासंचालक, अपर पोलिस महासंचालक आणि गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या नियंत्रण आणि देखरेखीखाली या टास्क फोर्सचे कामकाज चालणार आहे.

टास्क फोर्सची कार्यप्रणाली
सर्वोच्च/उच्च न्यायालय, शासन, पोलिस महासंचालक यांच्याकडून वर्ग केलेल्या अथवा सोपविण्यात आलेल्या प्रकरणाचा गुन्ह्यांचा तपास करणे, तसेच प्राप्त तक्रारी / माहितीबाबत शहानिशा करून विशेष पोलिस महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स यांच्या परवानगीने स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याचा तपास टास्क फोर्स करणार आहे. महाराष्ट्र राज्य अंमली पदाथिविरोधी टास्क फोर्स हे राज्यासाठी एनसीओआरडी सचिवालय म्हणूनही काम करणार आहे. तसेच, एनसीओआरडीच्या विविध स्तरावर घेतलेल्या निर्णयांच्या पूर्ततेच्या कार्यवाहीवर लक्ष ठेवणार आहेत. ज्या गुन्हयांचे स्वरूप संवेदनशिल आणि क्लिष्ट आहे. तसेच, ज्या गुन्हयांची व्याप्ती पूर्ण महाराष्ट्र राज्यात आणि महाराष्ट्र राज्याच्या बाहेर आहे, अशा गुन्ह्यांचा टास्क फोर्सकडे जाणार आहे. अन्य अंमली पदार्थविषयक गुन्हयांचा तपास यापूर्वी प्रमाणे पोलिस ठाणे किंवा स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून होईल. त्यावर प्रत्येक घटक प्रमुखांचे नियंत्रण राहणार आहे. मुंबई वगळून संपूर्ण महाराष्ट्र टास्क फोर्सचे कार्यक्षेत्र असणार आहे. फोर्स हे समन्वय सल्लागार तसेच नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. प्रत्येत महिन्याला प्रगती अहवाल पोलिस महासंचालक यांना सादर करण्यात
येणार आहे.

टास्क फोर्ससाठी भरती प्रक्रिया
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापन करण्यासाठी आवश्यक अधिकार्‍यांची पदे शासन मंजुरीनंतर पोलिस महासंचालक कार्यालयातील आस्थापना शाखेकडून भरण्यात येणार आहे. पोलिस हवालदार / सहायक पोलिस उप निरीक्षक ही पदोन्नत पदे असल्याने संबंधित घटकांकडून प्रतिनियुक्तीने पदे भरण्यात येतील. तसेच, पोलिस शिपाई वर्गाची पदे संबंधित घटकांकडून भरती प्रक्रिया करून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कार्यालयास वर्ग करण्यात येतील. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी ही पदे पोलिस महासंचालक कार्यालयातील प्रशासन शाखेकडून भरण्यात येतील. विशेष पोलिस महानिरीक्षक, अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स यांचे कार्यालय आणि त्यांच्या पुणे, नागपूर घटकांच्या वाहनासांठी लागणारे इंधन, वाहनांची दुरुस्ती, देखभाल तसेच शस्त्र व दारुगोळ्याचा पुरवठा, संबंधित परिक्षेत्रीय कार्यालय यांच्याकडून करण्यात येणार आहे.

अशी असेल टास्क फोर्सची संरचना
अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे प्रमुख हे विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी असतील. टास्क फोर्सचे मुख्यालय हे गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सध्याच्या मुख्यालयात असेल. त्यांच्या अधिपत्याखाली पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाचे पद मुख्यालयात कार्यरत असेल. पोलिस उप महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखाली पोलिस अधीक्षक, प्रशासन, पोलिस अधीक्षक, कृती पुणे विभाग व पोलिस अधीक्षक, कृती नागपूर विभाग असतील.

स्थानिक पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे काम सुरूच राहणार आहे. तसेच, आता राज्याचे टास्क फोर्सदेखील अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी समांतर कार्यवाही करणार आहे. या टास्क फोर्समुळे अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी अधिक क्षमतेने काम करता येणार आहे.

अमली पदार्थांमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम
महाराष्ट्र राज्यात अलीकडच्या काळात अंमली पदार्थाची विक्री वितरण आणि गैरवापर करणार्‍या प्रवृत्तीत वाढ झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. याबाबत आढावा घेतला असता, अंमली पदार्थाचा दुरुपयोग राज्याच्या प्रगतिशील आणि गतिमान अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम करीत असल्याचा निष्कर्ष शासनाकडून काढण्यात आला. तसेच, अंमली पदार्थाचे सेवन करणार्‍या राज्यातील तरुणांच्या सामाजिक, आर्थिकस्तरावर आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. याचे परिणाम संबंधित तरुणांचे कुटुंबीयदेखील भोगत असल्याचे वास्तव समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक राज्यात अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

    – संतोष पाटील, पोलिस निरीक्षक, अमली पदार्थविरोधी पथक, पिंपरी-चिंचवड

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT