Latest

Taliban ban beauty salons | तालिबान्यांचा आणखी एक फतवा, अफगाणिस्तानात महिलांच्या ब्युटी सलूनवर बंदी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांच्या विरोधात आणखी एक फतवा जारी केला आहे. या सरकारने महिलांवर यापूर्वी अनेक निर्बंध लादले आहेत. आता येथील सरकारने महिलांच्या ब्युटी सलूनवर बंदी घातली आहे. यामुळे शेकडो महिला बेरोजगार झाल्या आहेत. युद्धामुळे ग्रासलेला हा देश अत्यंत गरिबीशी लढा आहे. आता महिलांचे रोजगाराचे साधन गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. (Taliban ban beauty salons)

"काबूल आणि इतर प्रांतांमध्ये महिला चालवत असलेल्या सर्व ब्युटी सलूनवर ताबडतोब बंदी घातली पाहिजे आणि आमच्या आदेशाचे पालन केले पाहिजे," असे सरकारच्या एका मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे. "त्यांना २ जुलैपासून पुढे एक महिन्याची मुदत आहे. त्यांनी या काळात ऑर्डर पूर्ण कराव्यात. उल्लंघन करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल," असा इशारा मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद सादेक अकीफ मुहाजीर यांनी दिला आहे.

ब्युटी पार्लरवर बंदी घालण्यापूर्वी तालिबानने मुलींना शाळा, जिम, पार्क आणि स्विमिंग पूलमध्ये जाण्यास बंदी घातली होती. हल्लीच त्यांनी महिलांना संयुक्त राष्ट्रात काम करण्यासही बंदी घातली होती. त्यापूर्वी तालिबानने महिलांसाठी सक्तीच्या ड्रेस कोडचे आदेश दिले होते आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध घातले होते. त्यांनी पुरुष नातेवाईकाला सोबत घेतल्याशिवाय प्रवास न करण्याचे निर्देश दिले होते.

तालिबानच्या या कृत्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध केला जात आहे. तसेच महिलांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी याविरोधात निर्दशने करूनही तालिबानने निर्बंध कायम ठेवले आहेत. ब्युटी सलून बंद करणे हा तालिबानने १९९६ ते २००१ दरम्यान सत्तेत असताना लागू केलेल्या निर्बंधाचा एक भाग होता. पण २००१ मध्ये अफगाणिस्तानवर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आक्रमणानंतर काबूलमध्ये गेल्या दोन दशकांत शेकडो ब्युटी पार्लर सुरू झाले होते. पण आता तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांच्या ब्युटी सलूनवर बंदी घातली आहे.

ह्युमन राइट्स वॉच (HRW) ने महिला आणि मुलींच्या हक्कांच्या बाबतीत अफगाणिस्तानचा जगातील सर्वात प्रतिबंधित देश म्हणून उल्लेख केला आहे. HRW च्या म्हणण्यानुसार, महिलांना सर्व नेतृत्व पदांवरून काढून टाकले जात होते आणि अफगाणिस्तानच्या बहुतेक प्रांतांमध्ये त्यांना पुरुषासोबत प्रवास करण्याची अट घातली आहे. "महिलांना बहुतांश क्षेत्रात रोजगाराचा अधिकार नाही आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांमध्ये (आरोग्य सेवा, पोषण आणि प्राथमिक शिक्षण वगळता) काम करण्यापासून प्रतिबंधित केले आहे."

आता नवीन लागू केलेल्या निर्बंधावर प्रतिक्रिया व्यक्त करताना एका अफगाण महिलेने बीबीसी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की तालिबानी अफगाण महिलांकडून सर्वात मूलभूत मानवी हक्क हिरावून घेत आहेत. "असे दिसते की तालिबानकडे महिलांच्या शरीरावर लक्ष केंद्रित करण्याशिवाय दुसरी कोणतीही राजकीय योजना नाही. ते सार्वजनिक जीवनात प्रत्येक स्तरावर महिलांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत," असे व्यथा तिने मांडली. (Taliban ban beauty salons)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT