Latest

Talathi Exam Nashik : तलाठी परीक्षा गैरप्रकारात एकास पोलिस कोठडी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

म्हसरूळ येथील परीक्षा केंद्रावरील तलाठी परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचा प्रकार म्हसरूळ पाेलिसांनी १७ ऑगस्ट रोजी उघडकीस आणला होता. पोलिसांनी या गुन्ह्यात अर्जुन छोटीराम जारवाल (२८, रा. ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यास अटक केली आहे. न्यायालयाने अर्जुनला मंगळवार (दि.१९)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. Talathi Exam Nashik

राज्यभरात तलाठी परीक्षा (Talathi Exam) सुरू असून, शहरातील म्हसरूळ येथील वेब इन्फोटेक सोल्युशन या परीक्षा केंद्राबाहेर संशयित गणेश श्यामसिंग गुसिंगे (२८, रा. ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) हा संशयास्पद फिरताना आढळला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केली. गणेश हा परीक्षा केंद्रात असलेल्या परीक्षार्थी संशयित संगीता रामसिंग गुसिंगे (२१) हिला प्रश्नांची उत्तरे पुरवत असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी संशयित गणेशला अटक करीत त्याच्याकडून टॅब, मोबाइल, वॉकीटॉकी व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले. न्यायालयाने गणेशला सुरुवातीस पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस तपासात संगीताच्या तळपायास चिप व कानात छाेटेसे उपकरण असल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे गणेश गुसिंगे विरोधात यापूर्वी २०१९ मध्ये म्हाडा भरती व २०२१ मध्ये पिंपरी-चिंचवड येथील पोलिस भरतीचा पेपर फोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. परीक्षार्थी संगीता हिच्या मागावर पोलिस असून, ती परीक्षेनंतर पसार झाली आहे. दरम्यान, म्हसरूळ पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयित अर्जुन जारवाल यास पकडले आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता सरकारी पक्षातर्फे ॲड. विजय साळुंके यांनी युक्तिवाद केला. गणेशने तलाठी परीक्षेतील प्रश्न टेलिग्रामद्वारे अर्जुनला पाठवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अर्जुनच्या मोबाइलचा तपास करणे, अर्जुनने गणेशला मदत कशी केली, अर्जुनविरोधात कॉपी प्रकरणाशी संबंधित ठाणे, जालना येथेही गुन्हे दाखल असल्याने तो सराईत दिसतो. त्यामुळे त्यास पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने मंगळवार (दि.१९)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. Talathi Exam Nashik

फरार संशयितांचा शोध सुरू

या गुन्ह्यातील संशयित संगीता गुसिंगे हिच्यासह सचिन ऊर्फ जीवन मानसिंग नायमाने, जीवन ऊर्फ विजय काकडवाल, योगेश रामसिंग गुसिंगे व कैलास विजयसिंग बहुरे (सर्व रा. छत्रपती संभाजीनगर) हे फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत असून, त्यांना अटक केल्यानंतर या गुन्ह्याचा पूर्ण उलगडा होण्यास मदत होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT