नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अनेक आक्षेपार्ह विधाने केली असून याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली जावी. तसेच त्यांची वादग्रस्त विधाने कामकाजातून वगळली जावीत, अशी मागणी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज (दि.८) लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली.
लोकसभेत सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाल्या झाल्या प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी यांच्या विधानांचा मुद्दा उपसि्थत केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेताना गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचे उद्योगपती गौतम अदानींसोबत निकटचे संबंध असल्याचा तसेच अदानींसाठी केंद्र सरकारने अनेक नियम पायदळी तुडवले असल्याचा गंभीर आरोप केला होता. संसदेच्या नियमावलीनुसार जर कुणा सदस्याला काही आरोप करायचे असतील. तर तत्पूर्वी तशी नोटीस द्यावी लागते, पण अशी कोणतीही नोटीस न देता राहुल गांधी यांनी बेफाम आरोप केलेले आहेत. याबद्दल गांधी यांच्यावर कारवाई करावी तसेच त्यांची वादग्रस्त विधाने कामकाजातून वगळली जावीत, असे जोशी म्हणाले.
भाजपचे सदस्य निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केलेला आहे. हा प्रस्ताव स्वीकृत केला जावा, अशी विनंतीही प्रल्हाद जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली. सदर प्रकरणाचा अभ्यास करुन पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन बिर्ला यांनी जोशी यांना दिले.
हेही वाचा