अदानी ९ वर्षांत दुसऱ्या क्रमांकावर कसे पोहोचले? राहुल गांधींचा लोकसभेत प्रश्नांचा भडीमार | पुढारी

अदानी ९ वर्षांत दुसऱ्या क्रमांकावर कसे पोहोचले? राहुल गांधींचा लोकसभेत प्रश्नांचा भडीमार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : २०१४ या वर्षी जगातील श्रीमंतांच्या यादीत ६०९ व्या क्रमांकावर असलेले अदानी ९ वर्षांमध्‍ये  दुसऱ्या क्रमांकावर कसे काय पोहोचले, असा खोचक सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. अदानी उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कोणते संबंध आहेत? असा सवाल करत अदानींना फायदा पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने अनेकदा नियम वाकविले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी आज लोकसभेत बोलताना केला.

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

संसदेच्या उभय सदनांमध्ये मागील काही दिवसांपासून अदानी प्रकरणावरुन गदारोळ सुरु आहे. अदानी समुहावर झालेल्या आरोपांची जेपीसीमार्फत अथवा निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरुन विरोधक आक्रमक आहेत. या पार्श्वभूमीवर अदानीचाच मुद्दा केंद्रीभूत करीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकारवर निशाणा साधला.

२०१४ साली जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत अदानी हे 609 व्या क्रमांकावर होते. त्यानंतर जादू झाली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. अदानी यांनी झटपट यश कसे काय मिळवले, याबाबत लोक विचारणा करीत आहेतच; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्याशी काय संबंध आहे, याबद्दलही त्यांच्यात कुतूहल आहे. ज्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हापासून त्यांचे अदानी यांच्याशी संबंध होते. गुजरातमध्ये अदानी यांचा झपाट्याने विकास होण्यामागे मोदींचा अदृष्य हात होता तर २०१४ साली केंद्रात मोदी आल्यानंतर देशपातळीवर अदानींचा उदय होण्यामागेही मोदींचा हात होता, असा आरोप गांधी यांनी केला.

गौतम अदानी यांच्यासाठी विमानतळ संचलनासाठीच्या नियमांत बदल करण्यात आले. ज्या कंपनीला आधी विमानतळ संचलनाचा कोणताही अनुभव नाही, अशा कंपनीला हे अधिकार देउ नयेत, असा नियम होता. पण तो नियम बदलण्यात आला. काही दिवसांपूर्वी हिंडेनबर्गचा अहवाल आला होता. अदानी यांच्या भारताबाहेर शेल अर्थात बनावट कंपन्या असल्याचे त्या अहवालात म्हटले होते. या शेल कंपन्या कोणाच्या आहेत. शेल कंपन्या हजारो कोटी रुपये भारतात पाठवित आहेत. तो पैसा कोणाचा आहे. अदानी हे काम मोफत करीत आहेत का, याचा खुलासा झाला पाहिजे, , अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

अदानी यांनी गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत भाजपला किती पैसे दिले, इलेक्ट्रोरल बाॅंडच्या माध्यमातून अदानींनी किती पैसा दिला, हेही समोर येणे गरजेचे आहे. आधी मोदी अदानींच्या विमानातून येत-जात असत. आता अदानी मोदींच्या विमानातून ये-जा करतात. मोदी आणि अदानी हे एकत्र काम करीत आहेत, असा सनसनाटी आरोप गांधी यांनी केला. आरोप करतानाच त्यांनी विमानात मोदी-अदानी एकत्र असल्याबाबतची काही छायाचित्रे सदनात दाखविली. यावरुन चांगलाच गदारोळ झाला.

‘एलआयसी’चा पैसा अदानीच्या कंपन्यांत का गुंतवण्यात आला?

पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला जातात आणि त्यानंतर जादू होउन स्टेट बॅंक अदानी समुहाला एक अब्ज डाॅलर्सचे कर्ज देते. त्यानंतर पंतप्रधान बांगलादेशला जातात आणि 1500 मेगावॅट क्षमतेचा तिथला प्रकल्प अदानीला मिळतो. मोदी इस्त्रायलला जातात आणि लगेच संरक्षण विषयक साहित्य निर्मितीच्या कंपन्या अदानी स्थापन करतात. विमानतळ संचलन क्षेत्रात अदानींची एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. मुंबईतील विमानतळाचे काम पूर्वी जीव्हीके कंपनीकडे होते. त्या कंपनीला तपास संस्थांचा धाक दाखवून बाहेर काढण्यात आले आणि हे विमानतळ अदानीकडे सुपूर्द करण्यात आले. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील, असे सांगतानाच एलआयसीचा पैसा अदानीच्या कंपन्यांत का गुंतवण्यात आला? असा सवाल राहुल गांधी यांनी उपसि्थत केला.

‘भारत जोडो‘ यात्रेदरम्यान आलेले अनुभव कथन करीत राहुल गांधी यांनी लोकसभेतील आपल्या भाषणाला सुरुवात केली. “भारत जोडो” दरम्यान काॅंग्रेसने लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या तर पक्षानेही आपली बाजू मांडली. काॅंग्रेसने यात्रेदरम्यान महिला, मुले, वरिष्ठ नागरिकांशी संवाद साधला. लोकांनी त्यांचे दुःख, वेदना कथन केल्याचे गांधी म्हणाले.

असंख्य युवकांनी आपण बेरोजगार असल्याचे, आपण उबेर गाड्या चालवित असल्याचे सांगितले. तर शेतकऱ्यांनी पीएम विमा योजनेचा पैसा मिळत नसल्याची तक्रार केली. आदिवासींनी त्यांची जमीन बळकावून घेण्यात आल्याची तक्रार केली. लोकांनी अगि्नवीर योजनेसंदर्भात असंख्य प्रश्न उपसि्थत केले. अगि्नवीर योजना ही लष्कराची स्वतःची योजना नसून आरएसएस, गृह मंत्रालय तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ही योजना थोपल्याचा संशय लष्करातील माजी सैनिकांनी आपल्याजवळ व्यक्त केल्याचे राहुल गांधी म्हणाले.

Back to top button