Latest

1993 Serial Bomb Blast Case | १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : राजस्थानच्या अजमेरमधील टाडा न्यायालयाने आज गुरुवारी लष्कर-ए-तोयबाचा मुख्य बॉम्ब मेकर अब्दुल करीम टुंडा (Abdul Karim Tunda) याची १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. टाडा न्यायालयाने पुराव्याअभावी त्याला निर्दोषमुक्त केले आहे. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणातील अमिनुद्दीन आणि इरफान या दोन आरोपींना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. "न्यायालयाने अब्दुल करीम टुंडाची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. अब्दुल करीम टुंडाच्या विरोधात कोणतेही सबळ पुरावे सादर करण्यात सीबीआयला अपयश आले," असे टुंडाचे वकील शफिकतुल्ला सुल्तानी यांनी म्हटले आहे. (1993 Serial Bomb Blast Case) दरम्यान, टुंडाच्या निर्दोष सुटकेला आव्हान देण्यासाठी सीबीआय सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर १९९३ मध्ये मुंबई, लखनौ, कानपूर, हैदराबाद आणि सुरतच्या काही रेल्वे गाड्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यात दोन जण ठार आणि अनेकजण जखमी झाले होते. मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर काही महिन्यांनी कोटा, कानपूर, सिकंदराबाद आणि सुरतमधून जाणाऱ्या गाड्यांमध्ये स्फोट झाले होते. या साखळी बॉम्बस्फोटांनी देश हादरला होता. दहशतवादी कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत विविध ठिकाणचे सर्व खटले एका विशेष न्यायालयाने एकत्रित केले आणि त्यांची सुनावणी केली. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी केंद्रीय एजन्सी सीबीआयकडे होती.

या प्रकरणी अजमेरच्या टाडा न्यायालयात हा खटला सुरू होता. या प्रकरणात दहशतवादी अब्दुल करीम उर्फ ​​टुंडा, इरफान आणि अमिनुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप होते. अब्दुल करीमला २०१३ मध्ये नेपाळ सीमेवर पकडण्यात आले होते. टुंडा अजमेर तुरुंगात बंद आहे.

सीबीआयने टुंडा याला साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचे म्हटले होते. त्याला २०१३ मध्ये नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती. टुंडावर देशात विविध ठिकाणी दहशतवाद प्रकरणी खटले प्रलंबित आहेत. तरुणांना भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिल्याचा टुंडावर आरोप आहे. पाकिस्तानी नागरिक जुनैद याच्यासोबत त्याने १९९८ मध्ये गणेशोत्सवादरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखली होती.

"डॉ बॉम्ब" म्हणून ओळख, कोण आहे टुंडा?

मुंबईतील मुस्लिम समाजासाठी काम करण्याच्या उद्देशाने टुंडाने जालीस अन्सारी सोबत 'तंजीम इस्लाह-उल-मुस्लिमीन' या संघटनेची स्थापना केली होती. मध्य दिल्लीतील दरियागंजमधील छत्तालाल मियाँ भागात एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या टुंडाने सुरुवातीला उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील पिलखुआ गावातील बाजार खुर्द भागात त्याच्या मूळ गावी कारपेंटरचे केले होते. टुंडाचे वडील उदरनिर्वाहासाठी तांबे, जस्त आणि ॲल्युमिनियम सारखे धातू वितळवण्याचे काम करत असत. वडिलांच्या मृत्यूनंतर टुंडाने भंगार व्यवसाय सुरू केला. कट्टरपंथी जिहादी दहशतवादी बनण्यापूर्वी त्याने कपड्यांचा व्यवसायही केला. ८० च्या दशकात तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या माध्यमातून लष्कर-ए-तैयबाच्या संपर्कात आला होता.

टुंडा सध्या ८४ वर्षांचा आहे. तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तो इतर अनेक बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये आरोपी आहे. दहशतवादी दाऊद इब्राहिमचा जवळचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टुंडाला त्याच्या बॉम्ब बनवण्याच्या कौशल्यासाठी "डॉ बॉम्ब" म्हणून ओळखले जाते. (1993 Serial Bomb Blast Case)

वयाच्या ६५ व्या वर्षी १८ वर्षांच्या मुलीशी तिसरे लग्न

टुंडाने तीन वेळा लग्न केले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्याने १८ वर्षांच्या मुलीशी तिसरे लग्न केले होते. टुंडाचा लहान भाऊ अब्दुल मलिक अजूनही कारपेंटरचे काम करतो. १९९२ मध्ये भारतातून बांगलादेशात पळून गेलेल्या टुंडाने बांगलादेश आणि नंतर पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT