IPL 2024

T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपपूर्वी पंत-सॅमसनमध्ये रंगलं ‘युद्ध’, कर्णधार रोहित घेणार अंतिम निर्णय

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : टीम इंडियाचे खेळाडू आयपीएलनंतर थेट टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा मागच्या आठवड्यात करण्यात आली आहे. संघात निवडलेले 15 खेळाडू आयपीएलमध्ये आपली ताकद दाखवत आहेत, ज्यामुळे ते टी-20 विश्वचषकातील प्लेइंग 11 साठी कर्णधार रोहित शर्माची पहिली पसंती बनू शकतात. अशा परिस्थितीत प्लेइंग 11 मधील स्थानासाठी दोन खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पहायला मिळत आहे. मात्र यापैकी टीम इंडियाची पहिली पसंती कोणाला असेल हे फक्त कर्णधार रोहित शर्मालाच ठरवावे लागणार आहे.

टीम इंडियाच्या 'या' दोन खेळाडूंमध्ये 'युद्ध'! (T20 World Cup)

टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी भारतीय संघात ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांचा यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. पण आता प्लेइंग 11 साठी कर्णधार रोहितची पहिली पसंती कोण असेल हे ठरवणे खूप कठीण जाणार आहे. एमएस धोनीनंतर ऋषभ पंत हा टीम इंडियासाठी पहिल्या पसंतीचा विकेटकीपर राहिला आहे. मात्र 30 डिसेंबर 2022 च्या पहाटे झालेल्या कार अपघातानंतर तो टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही. 2023 चा आयपीएल हंगामही तो खेळू शकला नाही. पंतच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला काही वेळा खेळण्याची संधी मिळाली. पण आता हे दोन्ही खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये स्वत:ला सिद्ध करत आहेत जेणेकरून त्यांना विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियासाठी खेळता येईल.

संजू सॅमसनचे चोख प्रत्युत्तर

संजू सॅमसनबद्दल नेहमीच असे म्हटले जाते की तो सातत्यपूर्ण नाही. तो चांगला खेळाडू आहे पण सातत्याने धावा करत नाही. मात्र, त्याने यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी करून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. सॅमसनने सध्याच्या आयपीएलमध्ये 11 सामन्यात 67.29 च्या सरासरीने 471 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 163.54 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या असून यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वोत्तम सरासरी आणि स्ट्राइक रेट आहे. अशा परिस्थितीत संजूचा फॉर्म त्याला पहिल्या यष्टीरक्षक निवडीचा प्रबळ दावेदार बनवत आहे.

ऋषभ पंतचे धमाकेदार पुनरागमन

ऋषभ पंतने आयपीएल 2024 मधून क्रिकेटच्या मैदानात पुनरगमन केले. त्यापूर्वी त्याने 2022 च्या अखेरीस काही व्यवसाईक सामने खेळले होते. हे कमबॅक त्याच्यासाठी फलदायी ठरले आहे. दुखापतीतून सावरत त्याने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत विकेटच्या मागे आणि फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याचे हे प्रदर्शन पाहून सर्वांनी त्याचे कौतुक केले आहे. पंतने या हंगामात आतापर्यंत 12 सामन्यांत 41.30 च्या सरासरीने 413 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या स्ट्राइक रेट 156.44 असून त्याच्या नावावर 3 अर्धशतके जमा झाली आहेत. त्यामुळे अगामी टी-20 वर्ल्डकपच्या प्लेईंग 11 मध्ये नेमके कुणाला स्थान मिळेल याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT