पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचा सिलसिला थांबतचं नाहीये. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्यानंतर आता स्वरा भास्करला जीवे (Swara Bhaskar) मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्वरा भास्करला एका अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. स्वराला जीवे मारण्याची धमकी देणारे हे पत्र स्पीड पोस्टने तिच्या घरी पाठवण्यात आल्याचे समजते. (Swara Bhaskar)
स्वराला जीवे मारण्याची धमकी देणारे हे पत्र हिंदीत लिहिले आहे. यामध्ये स्वरा हिला शिवीगाळ करण्यात आली असून विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केल्याबद्दल तिला इशारा देण्यात आला आहे. या पत्राच्या शेवटी स्वाक्षरीच्या जागी 'या देशाचे तरुण' असे लिहिले आहे. यानंतर स्वराने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी स्वराने २८ जून रोजी २०२२ वर्सोवा पोलिस ठाण्यात येवून कळवले होते. तिने तक्रारीत म्हटले होते की, एक अनोळखी व्यक्तीने दि. २४ जून २०२२ रोजी पत्र पाठवून सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, आपण फक्त आपल्या चित्रपटावर लक्ष केंद्रीत करा असे सांगून शिवीगाळ केली व बघून घेईन अशी धमकी दिली.
या तक्रारीनंतर वर्सोवा पोलिस ठाण्यातत अदखलपात्र दु. नोंद. क्र. ४६२/२०२२ कलम ५०४, ५०६ भादंवि अन्वये नोंद घेण्यात आली आहे.
स्वराने सावरकरांबद्दल अनेकदा पोस्ट केले होते. स्वरा सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत व्यक्त करते. २०१७ मध्ये स्वराने एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने लिहिले होते की, 'सावरकरांनी ब्रिटिश सरकारची माफी मागितली होती आणि तुरुंगातून सुटकेची याचना केली होती. यावरून ते निश्चितचं 'वीर' नव्हते. २०१९ मध्येही तिने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने अपशब्द वापरले होते.
स्वरा भास्करने २०१० मध्ये 'गुजारिश' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी 'तनु वेड्स मनू', 'रांझना', 'प्रेम रतन धन पायो', 'निल बट्टे सन्नाटा', 'अनारकली ऑफ अरह' आणि 'वीरे दी वेडिंग' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय स्वरा 'रासभरी', 'मांस' आणि 'भाग बिन्नी भाग' यांसारख्या वेब सीरिजमध्येही दिसली आहे.