उस्मानाबाद; भीमाशंकर वाघमारे : तुमच्या मनात कितीही कपट असले तरी आम्ही तुम्हाला भाऊ मानतो. आज तुम्ही कोणत्या आमिषाने वेगळे झाला आहात याची माहिती आम्हाला नाही. मात्र यापूर्वी जी भावंडं तुमच्या खांद्याला खांदा लावून लढलीत ती पीकविम्यासाठी चार दिवसांपासून उपाशी बसली आहेत. तरीही तुमच्या घशाखाली घास कसा उतरत आहे, असा सवाल शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. (Sushma Andhare)
आमदार पाटील यांनी पीकविम्यासाठी सुरु केलेल्या उपोषणाला भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी अंधारे म्हणाल्या की, पीकविम्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही संबंधित विमा कंपनी शेतकर्यांना २०२० चा पीकविमा वाटप करीत नाही. त्यामुळे आता शेतकर्यांनी याबाबत दाद कोणाकडे मागायची? असे कोणते न्यायालय आहे जिथे सर्वोच्च न्यायालयानंतरही दाद मागता येईल? असे सवाल अंधारे यांनी उपस्थित केले.
पीकविमा मिळण्याबाबत योग्य ती माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी द्यावी अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली. घटनात्मक पदाचा मान राखण्याची आमची तीव्र इच्छा आहे. पण या पदावरील व्यक्तींचे बोलणे, वर्तन तसे नसल्याने अनेकदा आमचा नाईलाज होतो. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आता मागणी करण्यात काहीच अर्थ नाही. कारण भाजपने त्यांना गुळाचा गणपती म्हणून बसवले आहे. शिंदे यांच्याकडे काहीच अधिकार नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीच यावर काहीतरी पावले उचलावीत. (Sushma Andhare)
यावेळी बोलत असताना अंधारे यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांना टोला लगावला. त्या म्हणाल्या, की बच्चू कडू यांचा प्रेमभंग झाला आहे. सुरत, गुवाहटीला ते गेले. ते स्वाभिमानी आहेत. पण स्वाभिमानाशी तडजोड करुन उपाशी तापाशी, दहशतीखाली राहिले. हिंदुत्वासाठी स्वाभिमान गहाण ठेवूनही बच्चू कडूंना मंत्रीपदापासून वंचित ठेवले. संजय शिरसाट यांच्यावरही अन्याय केला. त्यामुळे एकनाथ भाऊंचा मी निषेध करत आहे. शिंदे यांनी आपल्यासोबत आलेल्या भावंडांना मंत्रीपदापासून वंचित ठेवले आहे, अशी टीका यावेळी त्यांनी केली.
हेही वाचा