पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक वर्ष एखाद्या क्षेत्राला व्यक्ती योगदान देते. अखेर निवृत्तीचा दिवस उजाडतो. संपूर्ण आयुष्य ज्या कामासाठी वेचले ते काम आता थांबणार, या विचारामुळे निवृत्त होणारी व्यक्ती भावनिक होते; मग न्यायदानासारखं
वस्तुनिष्ठ पुरावे ग्राह्य मानून काम करणारी व्यक्तीही त्याला अपवाद ठरत नाही. आज सर्वोच्च न्यायालयाच्या भिंतींनीही अशाच एका भावूक क्षणाचा अनुभव घेतला. सर्वोच्च न्यायालयाचे ( Supreme Court ) न्यायमूर्ती एम. आर. शहा ( M. R. Shah ) आज (दि. १५) निवृत्त झाले. या प्रसंगी 'मेरा नाम जोकर' चित्रपटातील गीताचे स्मरण करत त्यांनी आपल्या भावनांना वाट करुन दिली.
सर्वाधिक निकाल देणार्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमध्ये एम. आर शहा यांच्या नावाचा समावेश होतो. मागील चार वर्षांमध्ये त्यांनी सुमारे ७१२ खटल्यांमध्ये फैसला सुनावला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि दिल्ली सरकार विरुद्ध नायब राज्यपाल प्रकरणांवर निर्णय देणाऱ्या नुकत्याच सुनावणी झालेल्या घटनापीठाचे ते सदस्य होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या परंपरेप्रमाणे निवृत्त होणारे न्यायमूर्ती हे सरन्यायाधीशांच्या खंडपीठाबरोबर आसन ग्रहण करतात. आज न्यायमूर्ती शहा यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासोबत आसन ग्रहण केले. यावेळी ॲटर्नी जनरल आर. वेंकटरामानी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यासह अनेक वकिलांनी यांचे कार्यपद्धतीचे कौतुक केले. ( M. R. Shah )
निवृत्ती प्रसंगी न्या. शहा यांनी सर्वांचे आभार मानले. "कल खेल में हम हो ना हो, गर्दीश में तारे रहे सदा…" या गाण्याचे
स्मरण करत ते भावूक झाले. त्यांचा गळा दाटून आला. ते म्हणाले, मी भावनिक झालो आणि रडू लागलो तर मला माफ करा. कारण मी नारळासारखा आहे. तुम्ही सर्वांनी मला कुटुंबातील सदस्य म्हणून स्वीकारले आहे. मला पूर्ण पाठिंबा दिला आहे. सरन्यायाधीशांनी मला एक भाऊ म्हणून नेहमीच प्रोत्साहन दिले. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
"मी नेहमी कामाला आणि याचिकाकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. न्यायदान करताना कोणचीही भीती बाळगली नाही. तसेच नेहमीच पक्षपात न करता माझे कर्तव्य बजावले. माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माफी मागतो. मी नेहमी माझ्या कामावर विश्वास ठेवला. या प्रसंगी काहींनी सांगितले की, माझ्या कोर्टात मी नेहमी सिनियर आणि ज्युनियर यांना समानच वागणूक द्यायचो; पण मी थोडा वेगळा विचार करतो. मी ज्युनिअर वकिलांकडे अधिक झुकत होतो. कारण मला नेहमी वाटायचे की चांगले युक्तीवाद करणारे वकील तयार व्हावेत. आज मी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणून निवृत्त होत आहे;पण मी निवृत्त होणारी व्यक्ती नाही, मी एक नवीन इनिंग सुरू करणार आहे, असेही न्या. शहा यांनी यावेळी नमूद केले.
हेही वाचा :