जयपूर; वृत्तसंस्था : शेवटच्या चेंडूवर हैदराबादला विजयासाठी हव्या 5 धावा… अब्दुल समदने संदीप शर्माचा चेंडू उंच फटकावला… पण तो थेट लाँगऑफवरील बटलरच्या हातात… राजस्थानचा विजयी जल्लोष सुरू… पण काही क्षणापुरताच…. तेवढ्यात नोबॉलचा हुटर वाजला…. हैदराबादला फ्री हिट मिळाली… नशिबाने मिळालेल्या संधीची समदने चांदी केली.. या फ्री हिटवर समदने गोलंदाजाच्या डोक्यावरून फ्लॅट सिक्सर मारला आणि हैदराबादने हरलेला सामना जिंकला. (RR vs SRH)
आयपीएल स्पर्धेला स्पेशल बनवणारा हा थरार घडला सवाई मानसिंग स्टेडियमवर. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत 2 बाद 214 धावा केल्या. गुणतालिकेत तळात असलेल्या हैदराबादकडून हे आव्हान गाठले जाईल, अशी फारशी अपेक्षा नव्हती; परंतु अनिश्चिततेचे दुसरे नावच क्रिकेट असल्याने हैदराबादने हा अशक्यप्राय विजय मिळवून सर्वांना धक्का दिला. (RR vs SRH)
राजस्थानच्या 215 धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या अभिषेक शर्माने 55 धावा केल्या. त्याला राहुल त्रिपाठी (47), अनमोलप्रीत सिंह (33) हेन्री क्लासेन (26) यांनी साथ दिल्याने हैदराबादला विजयी लक्ष्याच्या जवळ जाता आले. शेवटच्या षटकांत 17 धावांची रक्षण करण्याची जबाबदारी संदीप शर्मावर होती; परंतु अब्दुल समदने यात दोन षटकारांसह 19 धावा करीत हैदराबादचा विजय निश्चित केला.
तत्पूर्वी, राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलर 95 आणि संजू सॅमसनने 66 धावा ठोकत संघाला 200 पार पोहोचवले. यशस्वी जैस्वालनेही 18 चेंडूंत 35 धावांची खेळी करत चांगली सुरुवात करून दिली होती. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानाची स्टार सलामीवीर जोडी यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी धडाकेबाज सुरुवात केली. या दोघांनी पाचव्या षटकातच राजस्थानचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र, पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्को जॉन्सनने 18 चेंडूंत 35 धावा ठोकणार्या यशस्वी जैस्वालला बाद केले.
संजू सॅमसन आणि जोस बटलर यांनी दुसर्या विकेटसाठी 138 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. संजूने अर्धशतक पूर्ण केले, तर बटलर आपल्या शतकाच्या जवळ पोहोचला होता. मात्र भुवनेश्वरने 95 धावांवर बटलरला पायचित बाद केले. बटलरने 59 चेंडूंत 10 चौकार आणि 4 षटकार मारून ही खेळी सजवली. यानंतर संजूने 38 चेंडूंत नाबाद 66 धावा ठोकत हेमटायरच्या साथीने 10 व्या षटकात राजस्थानला 200 च्या पार पोहोचवले. राजस्थानने 20 षटकांत 2 बाद 214 धावा केल्या.
हेही वाचा;