पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय कॉमेंट्रेटर सुनील गावस्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. कॉमेंट्रीवेळी त्यांनी राजस्थान रॉयल्स संघाचा फलंदाज शिमरोन हेटामायर यांच्या पत्नीसंदर्भात विधान केले. यावर ते मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत असून, त्यांना कॉमेंट्रेमधून हटविण्यात यावे, अशी मागणी नेटकरी करत आहेत. ( Gavaskar Controversy ) यापूर्वी क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्यामुळे गावस्कर वादाच्या भोवर्यात सापडले होते.
शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना झाला. राजस्थानचा शिमरॉन हिटमायर फलंदाजीसाठी मैदानात आला. या वेळी सुनील गावस्कर म्हणाले की, हेटमायरच्या पत्नीची नुकतीच डिलिव्हरी (प्रसूती ) झाली आहे. आता पहावे लागेल की, हेटमायर कशी डिलिव्हरी करणार. या खेळीत हिटमायर हा सात चेंडूत ६ धावांवर बाद झाला. गावस्कर यांनी हेटमायर याच्या पत्नीच्या प्रसूतीचा उल्लेख करण्याची गरज नव्हती, असे म्हणत नेटकर्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले. त्यांना तत्काळ कॉमेंट्रेटर पॅनेलमधून हटविण्यात यावे, अशी मागणीही काहींनी केली.
वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरोन हेटमायर हा नुकताच वडील झाला आहे. पत्नीच्या प्रसूतीसाठी आयपीएलमध्ये रजा घेत तो मायदेशी गेला होता. पत्नीची प्रसूती झाल्यानंतर ते पुन्हा आयपीएलच्या मैदानात परतला आहे.
सुनील गावस्कर यांनी यापूर्वी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीबाबत वादग्रस्त विधान केले होते. जगात सर्वात कोरोना महामारीचे संकट असताना सर्व खेळाडू आपल्या घरात कैद होते. यावेळी विराट आणि अनुष्काचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये अनुष्का गोलंदाजी तर विराट फलंदाज करताना दिसत होते. यानंतर विराट जेव्हा मैदानात उतरला तेव्हा गावस्कर म्हणाले होते की, "विराट हा लॉकडाउन काळात अनुष्काबरोबर सराव करत होता". त्यांच्या या विधानावरही ते मोठ्या प्रमणावर ट्रोल झाले होते.
हेही वाचा :