पुढारी ऑनलाईन डेस्क : Shubman Gill Nickname : भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर हे सलामीवीर शुभमन गिलच्या फलंदाजीचे चाहते झाले आहेत. गिलचे कौतुक करत गावसकरांनी आपल्या आवडत्या युवा क्रिकेटरचे नव्याने बारसे घातले असून 'स्मूथमॅन गिल' असे टोपण नाव देऊन स्तुतीसुमने उधळली आहेत.
हैदराबादमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात गिलने दुहेरी शतक ठोकले. अशी लामगिरी करणारा जगातील सर्वात तरुण क्रिकेटपटू बनला. भारताने शनिवारी आणखी एक प्रभावी कामगिरी करून पाहुण्या न्यूझीलंडला दुस-या वनडे-मध्ये मात दिली. या सामन्यात 109 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना गिलने 53 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 40 धावांची चमकदार खेळी केली. या सामन्याचा तो हिरो ठरला नाही. पण गिलने आपली जबाबदारी पार पाडली, संघाच्या विजयात हातभार लावला.
कर्णधार रोहित शर्माने वयाच्या 26 व्या वर्षी द्विशतक झळकावले होते. त्या तुफानी खेळीनंतर रोहितला हिटमॅन या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. दुसरीकडे शुबमन गिलने अवघ्या 23 व्या वर्षी दोनशे धावांचा टप्पा पार करून इतिहास रचला आहे. त्याने हिटमॅनला बरेच मागे टाकले आहे. गिलची ती खेळी पाहून अनेक दिग्गज माजी खेळाडू त्याचे चाहते झाले आहेत. माजी क्रिकेटर गावस्कर यांनी तर गिलला 'स्मूथमॅन गिल' असे गोंडस टोपण नाव दिले आहे.
21 जानेवारीला न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर या गिलने गावसकरांशी संवाद साधला. त्या वेळी, 'मी तुला स्मूथमॅन गिल हे नवीन टोपणनाव दिले आहे. मला आशा आहे की तुला याची हरकत नसेल,' असे गावसकरांनी म्हटले. यावर गिलने, 'सर मला अजिबात आक्षेप नाही. उलट तुमच्या सारख्या महान खेळाडूकडून मला ही उपाधीच मिळाली आहे, असे मी समजेन,' अशी भावना बोलून दाखवली. (Shubman Gill Nickname)