Latest

१५ किमी पायपीट करत रोमानिया गाठले, युक्रेनमधून सांगलीत परतलेल्या विद्यार्थ्याने सांगितला थरारक अनुभव

Shambhuraj Pachindre

सांगली : पुढारी वृत्तसेवा

युक्रेनमध्ये अडकलेला सांगलीतील तोहीद बशीर मुल्ला हा विद्यार्थी बुधवारी सांगलीत परतला. आतापर्यंत 14 पैकी दोघे परतले असून, आणखी 12 जण युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यापैकी काहीजण सध्या परतीच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले. तोहीद हा 2018 मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमधील वेस्टर्न पार्ट येथे गेला होता.

सांगलीच्या संजयनगरमधील तोहीद बशीर मुल्ला बुधवारी दुपारी घरी आला. वाटेगाव (ता. वाळवा) येथील श्रद्धा महावीर शेटे ही विद्यार्थिनी यापूर्वीच परतली आहे. तिची बहिणदेखील परतीच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले. युक्रेनमध्ये ठिकठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना सध्या भारतीय दूतावासाकडून रोमानिया, पोलंड आदी देशांत नेले जाते. तेथून भारतात परत आणण्यात येत आहे.

तोहीद मुल्ला म्हणाला, भारतीय दूतावासाकडून वेळेत सूचना न मिळाल्याने भारतीय विद्यार्थ्यांचा गोेंधळ उडाला होता. तोहीद हा वेस्टर्न पार्ट शहरात नॅशनल मेडिकल युनिर्व्हसिटीमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत आहे. रशियन सैन्याने हल्ल्याची तीव्रता
वाढविल्याने खारकीव येथे पोहोचल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली होती. कोठे जायचे, काय करायचे हे कोणाला काहीच समजत नव्हते. सर्व मुले भारतीय दूतावासाकडून मदत मिळेल या अपेक्षेने फोन करीत होती. परंतु तेथून फक्त "तुम्ही आहे तेथेच थांबा" एवढेच सांगण्यात येत होते.

तो म्हणाला, वेस्टर्न पार्ट येथून रोमानिया जवळच असल्याने माझ्यासह काही विद्यार्थ्यांनी खासगी बस केली. ती बस देखील रोमानियापासून 15 किलोमीटर दूरच थांबविण्यात आली. तेथून 15 किलोमीटर अंतर पायी जाऊन रोमानिया गाठले. तेथे रोमानियाच्या गेटवर सुमारे दोन हजार विद्यार्थी थांबले होते. काही जण पोलंडकडे गेले होते. रोमानियामध्ये पोहोचल्यानंतर मात्र भारतीय दूतावासाकडून मदत करण्यात आली. तेथे गाडीने विमानतळापर्यंत पोहोचविण्यात आले. तेथून विमानाने भारतात आणण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT