Latest

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स पुन्हा नव्या शिखरावर! ६७,१०० वर उसळी, निफ्टी १९,८०० वर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजाराने आज मंगळवारी ऐतिहासिक कामगिरी केली. मजबूत जागतिक संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात कायम राहिलेला ओघ यामुळे आज सेन्सेक्सने ६७,१०० चा आणि निफ्टीने १९,८०० चा टप्पा पार केला. त्यानंतर सेन्सेक्स ३०२ अंकांनी वाढून ६७,०९७ वर बंद झाला. तर निफ्टी ८३ अंकांच्या वाढीसह १९,८३३ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

बाजारात आज चौफेर खरेदी पाहायला मिळाली. यात मुख्यत: आयटी आणि बँकिंग स्टॉक्स आघाडीवर राहिले. तर ऑटो स्टॉक्सवर दबाव दिसून आला. जून तिमाहीतील कंपन्यांची चांगली कामगिरी, हेवीवेट स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी आदींमुळेही बाजाराला सपोर्ट मिळाला. PSU बँक २ टक्क्यांनी, तर पॉवर, हेल्थ केअर, ऑईल आणि गॅस प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.६ टक्क्यांनी वाढले.

काल सेन्सेक्स ६६,७९५ वर बंद झाला होता. आज तो ६६,९०५ वर खुला झाला. त्यानंतर त्याने ६७,१७७ पर्यंत वाढ नोंदवली. तर निफ्टी आज १९,८०२ वर खुला झाला होता. त्यानंतर तो १९,८४३ पर्यंत वाढला.

सेन्सेक्सवर एनटीपीसी हा शेअर टॉप गेनर राहिला. हा शेअर ३.१५ टक्के वाढून १९३.१० रुपयांवर पोहोचला. त्यासोबतच इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, टाटा मोटर्स, एसबीआय, सन फार्मा हे शेअर्सही वधारले. तर टीसीएस, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती हे शेअर्स घसरले.

'या' बँकेचा शेअर वाढला

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्राने एप्रिल-जूनच्या (FY24) तिमाहीत निव्वळ नफ्यात ९५ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या तिमाहीतील नफा ८८२ कोटी रुपये आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत नफा ४५१ कोटी रुपये होता. या पार्श्वभूमीवर बँक ऑफ महाराष्ट्राचे (Shares of Bank of Maharashtra) शेअर आज ३ टक्क्यांहून अधिक वाढून ३२.७० रुपयांवर पोहोचला.

जागतिक बाजारातील स्थिती

अमेरिकेतील मॉर्गन स्टॅनली, बँक ऑफ अमेरिका कमाईच्या अंदाजात अव्वल स्थानी आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील डाऊ जोन्स निर्देशांकाने सलग सातव्या सत्रात वाढ नोंदवली. आशियाई बाजारातही तेजी राहिली. जपानचा निक्केई निर्देशांक १.२४ टक्के वाढून ३२,८९६ वर बंद झाला. टॉपिक्स निर्देशांक १.१९ टक्के वाढून २,२७८ वर पोहोचला. तर हाँगकाँगचा हँग सेंग १.३ टक्क्यांनी वाढला. (Stock Market Closing Bell)

परदेशी गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक

गेल्या ११ ट्रेडिंग सत्रांत परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारात गुंतवणूक राहिली आहे. त्यांनी या सत्रांत बल्क डील वगळून केवळ शेअर बाजारात १५,१५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याउलट गेल्या १२ पैकी ८ सत्रांत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DII) ७,८६८ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.

 हे ही वाचा ;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT