Latest

राज्यातील एसटी आगार होणार स्वच्छ, सुंदर

अमृता चौगुले

राहुल हातोले

पिंपरी(पुणे) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियान' राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण राज्यातील स्थानके आता स्वच्छ व सुंदर होणार आहेत. शहरातील खासगी संस्थांना स्थानकावर मिळणार्‍या प्रसिध्दीच्या मोबदल्यात आगारात सुधारणा केली जाणार आहे. त्यामुळे आता एसटी स्थानकांचा लवकरच कायापालट होऊ शकणार आहे. एसटी स्थानकातील स्वच्छतागृहांचे तुटलेले दरवाजे, जागोजागी अस्वच्छता, तुटलेले नळ आणि घाणीचे साम्राज्य आहे. तसेच, स्थानक परिसरातील जागेचे काँक्रिटीकरण न झाल्याने जागोजागी असलेले खड्डे, त्यांमध्ये साचलेले पाणी, या सर्व समस्या लवकरच दूर होणार आहेत.

'बाळासाहेब ठाकरे अभियान'अंतर्गत प्रवाशांना दर्जेदार आणि गुणात्मक सेवा देण्याच्या उद्देशाने स्वच्छ बस, सुंदर बस स्थानके आणि स्वच्छ प्रसाधनगृहे, या त्रिसूत्रीवर आधारित हे अभियान राबिवण्यात येत आहे. यासाठी परिसरातील लघू, मध्यम आणि मोठे उद्योजक, व्यापारी, सहकारी संस्था यांच्याकडे सूचना मागविण्यात आल्या आहेत. या संस्थांना स्थानकात जाहिरात प्रसिद्धीस वाव मिळणार आहे. त्या मोबदल्यात कंपन्यांद्वारे स्थानकांत सुधारणा केल्या जाणार आहेत.

संस्थांसाठी काय सुविधा..?

  • वाहतुकीला अडथळा येणार नाही, अशा दर्शनी भागात 10 बाय 10 आकाराच्या मोकळ्या जागेत संस्थेच्या स्वखर्चाने तात्पुरता स्टॉल उभारून उत्पादन व सेवेची जाहिरात अथवा थेट विक्री करता येणार आहे.
  • स्थानकाच्या दर्शनी भागात 10 बाय 15 फुटांचे होर्डिंग उभारून जाहिरात करता येणार.
  • आगाराचे सूचनाफलक तसेच बस थांबणार्‍या जागेमध्ये प्रवाशांच्या निर्दशनास पडेल अशा जागेत आपली जाहिरात करता येणार आहे.
  • या सर्व कामांची देखभाल व दुरुस्ती केवळ एका वर्षासाठी असणार आहे.

या जाहिराती टाळल्या जातील

अमली पदार्थ, तंबाखू, गुटखा, दारू तत्सम पदार्थांचे उत्पादक व सेवा करणार्‍या संस्था अथवा कायद्याने जाहिरात करण्यासाठी प्रतिबंधित उत्पादने व सेवा यांच्या समुहांनी यामध्ये भाग घेण्याचे टाळावे. यांना अनुमती नाही.

  • योजनेबाबत माहिती www.msrtc.maharashtra.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

योजनेचा लाभ संस्था संघटनांसह एसटीलाही होणार

परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सुविधा आणि एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या वाढली आहे. प्रवासासाठी स्थानकात येणार्‍या प्रवाशांना संस्था-संघटनांच्या सेवा व उत्पादनाबद्दल अधिक माहिती मिळणार आहे. त्यामुळे संघटनांचा थेट नागरिकांशी संवाद होणार असल्याने त्यांच्या सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात संस्थांनी संमती दर्शविली, तर याचा लाभ एसटी स्थानकासदेखील होणार असून, सर्वांसाठी लाभदायी असणारी योजना, असा उल्लेख करण्यात येत आहे.

योजनेबाबत शहरातील प्रमुख सामाजिक संस्था व संघटनांसोबत चर्चा करण्यात आली आहे. काही संस्थांनी संमती दर्शविली असून, लवकरच आगारामध्ये सुधारणा होणार आहेत. ज्या संस्थांना सहभाग घेण्याची इच्छा आहे, त्यांनी विभाग नियंत्रकांकडे आपले अर्ज सादर करावेत.

– संजय वाळवे, आगारप्रमुख,
वल्लभनगर, पिं.-चिं. शहर

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT