स्पोर्ट्स

आयर्लंडविरुद्ध भारताची विजयी सलामी

Shambhuraj Pachindre

डब्लिन : वृत्तसंस्था भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात सहज विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे ही लढत 12-12 षटकांची खेळवण्यात आली आणि त्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सहज बाजी मारली. हॅरी टेक्टरने दमदार खेळ करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले; पण भारताच्या फलंदाजांनी सडेतोड उत्तर दिले. ईशान किशनने आक्रमक सुरुवात करून दिल्यानंतर अन्य फलंदाजांनी चोख भूमिका बजावली. त्यानंतर दीपक हुड्डा व हार्दिक पंड्या यांनी सुरेख खेळ करताना भारताचा विजय पक्‍का केला. आज, मंगळवारी भारत दुसरा टी-20 सामना खेळणार आहे.

भुवनेश्‍वर कुमारने पाचव्या चेंडूवर अँडी बालबर्नीचा (0) त्रिफळा उडवला. दुसर्‍या षटकात हार्दिक पंड्याने टाकलेला पहिला चेंडू पॉल स्टर्लिंगने कव्हरच्या दिशेने सीमापार पाठवला. पुढच्या चेंडूवर त्याने उत्तुंग फटका मारला; परंतु दीपक हुड्डाने अलगद झेल घेतला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक 34 विकेटस् घेण्याचा विक्रम भुवीच्या नावे नोंदवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये गोलंदाजी करणारा आणि विकेट मिळवणारा हार्दिक हा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला.

पदार्पणवीर उम्रान मलिकने पहिल्या षटकात 14 धावा दिल्या. आयर्लंडच्या हॅरी टेक्टर व लोर्कन टकर यांनी 29 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाला टफ फाईट दिली. टकर (18) व टेक्टर यांची 29 चेंडूंतील 50 धावांची भागीदारी युजवेंद्र चहलने संपुष्टात आणली. चहलने त्याच्या 3 षटकांत 11 धावा देताना 1 विकेट घेतली. टेक्टरने 33 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 64 धावा केल्या. आयर्लंडने 4 बाद 108 धावा केल्या.

भारताकडून दीपक हुडा व ईशान किशन ही जोडी सलामीला आली. ईशानने पहिल्याच षटकात तीन चेंडूंत 4, 6, 4 अशा 14 धावा चोपल्या. ईशानने फॉर्म कायम राखताना 2022 मध्ये आयसीसीच्या पूर्ण सदस्य असलेल्या संघांमध्ये टी-20 त 400 धावा करणार्‍या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. तिसर्‍या षटकात क्रेग यंगने भारताला धक्‍का देताना ईशानचा (26 धावा, 11 चेंडू, 3 चौकार व 2 षटकार) त्रिफळा उडवला. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव गोल्डन डकवर पायचित झाला. भारताने 4 षटकांत 2 बाद 45 धावा केल्या. दीपक हुडाने फटकेबाजीला सुरुवात केली. ऋतुराज गायकवाडला अद्यापही फलंदाजीला न पाठवल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

दीपक व हार्दिक यांनी अँडी मॅकब्रीनने टाकलेल्या 6 व्या षटकात 21 धावा चोपल्या. इथे आयर्लंडच्या हातून सामना निसटला. दीपक व हार्दिक यांनी 28 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. 8 व्या षटकात हार्दिक (24) बाद झाला अन् दीपकसह त्याची 64 धावांची भागीदारी संपुष्टात आली. 3 विकेटस् गेल्या तरी ऋतुराजला फलंदाजीला पाठवले गेले नाही. दीपक व कार्तिकने भारताचा 7 विकेटस् राखून विजय पक्‍का केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दीपक 47 धावांवर नाबाद राहिला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT