Yuzvendra Chahal Celebration: भारताचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या इंग्लंडमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळत आहेत. नॉर्थेम्पटनशायरकडून वनडे मालिका खेळल्यानंतर आता तो प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. रविवारी २३ ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात युझवेंद्र चहलने फारशी चमकदार कामगिरी केली नाही. मात्र त्यानं या सामन्यात असं काही चमकदार सेलिब्रेशन केलं की आज सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू झाली आहे.
युझवेंद्र चहलने या सामन्यात जेन झी वाले सेलिब्रेशन करून सर्वांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे हे सेलिब्रेशन आधी महिला दिल्ली प्रीमियर लीगमधील व्हायरल गर्ल मेधावी बिधूरीने केले होते.
नुकतेच दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर वुमेन्स दिल्ली प्रीमियर लीगचा तिसरा सिजनचा सामना सुरू होता. यावेळी सेंट्रल दिल्ली क्वीन्सकडून खेळणाऱ्या मेधावी बिधूरीने एक खास सेलिब्रेशन केलं. हे सेलिब्रेशन चांगलंच व्हायरल झालं होतं. सामन्यानंतर मेधावीने सांगितलं की हे जेन झी वाले सेलिब्रेशन तिच्या छोटी बहिणी करतात. याला ६-७ सेलिब्रेशन हे नाव देखील त्यांनी दिलं होतं. अजून एका सामन्यात तिने विकेट घेतल्यानंतर हेच सेलिब्रेशन केलं होतं.
इकडं मेधावीने हे जेन झी सेलिब्रेशन ट्रेंडमध्ये आणलं अन् तिकडं इंग्लंडमध्ये ३६ वर्षाच्या युझवेंद्र चहलने त्याला अजून मोठं स्वरूप दिलं. युझी फक्त सेलिब्रेशन करून थांबला नाही तर त्याने याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला. आता दिल्ली प्रीमियर लीगने देखील हा व्हिडिओ आपल्या अधिकृत हँडलवरून रिपोस्ट केला आहे. आता हे सेलिब्रेशन अन् ती व्हायरल गर्ल देखील चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.
युझवेंद्र चहल गेल्या काही काळापासून भारतीय संघापासून दूर आहे. युझवेंद्र चहल जरी भारतीय संघात नसला तरी तो पुनरागमनासाठी जोरदार तयारी करत आहे. तो इंग्लंडमध्ये जाऊन लिस्ट ए आणि प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. त्याचबरोबर तो आयपीएलमध्ये देखील सक्रीय असतो. मात्र डोमॅस्ट्रिक क्रिकेटमध्ये आधीच्या तुलनेत तो कमी सक्रीय दिसत आहे.