स्पोर्ट्स

Yuvraj Singh चा खळबळजनक खुलासा; ‘ना आदर.. ना पाठिंबा’, निवृत्तीच्या ५ वर्षांनंतर टीम इंडियातील 'त्या' वागणुकीवर स्पष्टच बोलला

Yuvraj Singh Retirement : मुलाखतीत या धक्कादायक निर्णयामागचे गुपित उघड

रणजित गायकवाड

मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'सिक्सर किंग' युवराज सिंगने २०१९ च्या विश्वचषकादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांनाच चकित केले होते. आता प्रदीर्घ काळानंतर युवराजने एका मुलाखतीत या धक्कादायक निर्णयामागचे गुपित उघड केले आहे. माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या यूट्यूब चॅनेलवरील पॉडकास्टमध्ये युवीने आपल्या कारकिर्दीतील गत कालखंडावर भावनिकरित्या प्रकाश टाकला.

जेव्हा क्रिकेट 'ओझे' वाटू लागले...

युवराजने जून २०१९ मध्ये एकदिवसीय विश्वचषक सुरू असतानाच निवृत्तीची घोषणा केली होती. सानियाच्या 'सर्व्हिंग इट अप विथ सानिया' (Serving it Up with Sania) या कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला, ‘खरं सांगायचं तर, त्या काळात मी खेळाचा आनंद घेऊ शकत नव्हतो. मी स्वतःलाच प्रश्न विचारू लागलो होतो की, मी नक्की कशासाठी खेळतोय? मला ना अपेक्षित पाठिंबा मिळत होता, ना आदर. जेव्हा तुम्हाला जाणवते की तुम्ही प्रगती करू शकत नाही, तेव्हा स्वतःला विनाकारण ओढत नेण्यात अर्थ नसतो. ज्या खेळाने मला सर्व काही दिले, तिथेच मला आनंद मिळत नव्हता. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मी अधिक काळ खेळू शकत नव्हतो. ज्या दिवशी मी थांबलो, त्या दिवशी मला खऱ्या अर्थाने मोकळे वाटले.’

गोल्फने दिली मानसिक शांतता

क्रिकेटनंतर युवराज सिंग आता गोल्फमध्ये रमला आहे. या खेळाबाबत बोलताना तो म्हणाला की, ‘गोल्फ मी फक्त स्वतःसाठी खेळतो, इथे कोणत्याही देशाचा किंवा संघाचा दबाव नसतो. मित्रांसोबत खेळताना मारलेले दूरवरचा फटका मला क्रिकेटमधील षटकारांची आठवण करून देतो,’ असे त्याने नमूद केले.

BCCI मध्ये नवी भूमिका?

भविष्यात निवड समिती किंवा प्रशासकीय भूमिका वठवण्याविषयी विचारले असता युवीने, ‘सध्या माझी मुले लहान आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवणे ही माझी प्राथमिकता आहे. मात्र, भविष्यात आयपीएलमध्ये कोचिंग किंवा मेंटरशिपची जबाबदारी स्वीकारण्यास मी उत्सुक असेन,’ असे त्याने सूचित केले.

युवराजच्या प्रवासातील काही महत्त्वाचे टप्पे:

कर्करोगाशी लढा आणि कठीण निर्णय : कर्करोगाचे निदान झाले तेव्हा डॉक्टरांनी त्याला ३ ते ६ महिन्यांचा अवधी दिला होता. ‘एकतर मैदानातच जीव गमावणे किंवा उपचार घेणे, असे दोनच पर्याय माझ्यासमोर होते. तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय होता,’ असे युवराजने सांगितले.

सहा षटकारांमागचे गुपित : २००७ च्या विश्वचषकात इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिंटॉफशी झालेला वादच सहा षटकारांचे निमित्त ठरला. तो राग आणि जुनून यामुळेच चेंडू सीमारेषेबाहेर फेकता आले, असे त्याने स्पष्ट केले.

सचिन तेंडुलकरची मागितली माफी : सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त एक जुनी छायाचित्र पोस्ट केल्याबद्दल युवराजने त्याची सार्वजनिक माफी मागितली. ड्रेसिंग रूममध्ये सचिनला मस्तीच्या मूडमध्ये पाहणे नेहमीच खास असल्याचे त्याने सांगितले.

वडिलांची शिस्त आणि सिद्धूंचे मत : सुरुवातीच्या काळात नवज्योत सिंग सिद्धू यांनी युवराजमध्ये गुणवत्ता नसल्याचे सांगत त्याला नाकारले होते. मात्र, त्यानंतर वडील योगराज सिंग यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमांमुळेच भारतीय क्रिकेटला एक महान अष्टपैलू खेळाडू मिळाला.

युवराजने २००० मध्ये पदार्पण केले आणि २००७ चा टी-२० विश्वचषक तसेच २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. २०११ च्या विश्वचषकात तो 'मालिकावीर' ठरला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT